दिलीप मोहिते पाटील : खेड-आळंदीसाठी राष्ट्रवादीकडून भरला उमेदवारी अर्ज
राजगुरूनगर – माझी ही शेवटची निवडणूक आहे. उत्तरार्ध आहे, म्हणून शेवट गोड व्हावा ही भावना आहे, असे भावनिक आवाहन माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. त्यापूर्वी खेड बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर, राष्ट्रवादीचे युवानेते ऋषिकेश पवार, कॉंग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा वंदना सातपुते, बाजार समितीचे सभापती बाळ ठाकूर, प्रदेश सदस्य डी. डी. भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा मोहिते, जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे, दीपाली काळे, अरुण चांभारे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, महिला अध्यक्षा संध्या जाधव, निलेश काळे, तुकाराम कांडगे, विलास कातोरे यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
दिलीप मोहिते म्हणाले, मागील काळात काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल जाहीर माफी असावी. आमदार असताना तालुक्यातील दादागिरीला थारा दिला नाही. आयुष्यात भ्रष्टाचारापासून लांब राहिलो. गेल्या पाच वर्षांत आमदार नसताना जनतेने मला आमदारकीची वागणूक दिली. मला दुसरीकडून अनेक ऑफर आल्या; मात्र शरद पवारांच्या सुख-दुःखात राहणे पसंत केले, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी रामदास ठाकूर आणि ऋषिकेश पवार यांनी भाषणे केली. प्रास्ताविक कैलास सांडभोर, सूत्रसंचालन पूजा, सुनील थिगळे तर कैलास लिंभोरे यांनी आभार मानले.
“त्या’ छळाला न्याय द्यायचा आहे..
चाकणमध्ये 30 जुलैला मराठा क्रांती मोर्चा झाला. समाजकंटकांनी दंगल केली; मात्र वर्षभरानंतर पोलीस माझ्या घरी आले, गुन्हा दाखल केला. पोलिसांवर दबाव होता म्हणून कारवाई केली. मला जेलमध्ये पाठवून निवडणुका जिंकण्याचा विरोधकांचा डाव होता. हा धक्का बसल्याने माझा भाऊ मी गमावला आहे. हा घाव माझ्या जिव्हारी लागला आहे. मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा तर काढणारच; मात्र क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांच्या छळाला न्याय द्यायचा आहे.