पुणे : इंधनदरवाढीची झळ बसत असल्याने महापालिका प्रशासन पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांसाठी 38 ई-कार भाडेतत्वावर घेणार आहे. या वाहनांचे चालकही भाडेतत्वावरील असतील. त्यामुळे महापालिकेकडील कायमस्वरुपी वाहनचालकांवर अन्याय होणार आहे. पालिकेने या कार भाडेकराराने न घेता, थेट निविदा मागवून खरेदी कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रशासन या ई-कार 8 वर्षे भाडेकराने घेणार असून, त्यासाठी सुमारे 23 कोटी 88 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच महापालिका प्रशासन 8 वर्षांनंतर या कार तिच्या मूळ किंमतीच्या 5 टक्के रक्कम देऊन विकत घेऊ शकणार आहे. या कारसाठी संबंधित ठेकेदारच चालक पुरवणार आहे. या प्रस्तावास महापालिका पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरील चालकांनी विरोध केला आहे. अशा प्रकारे भाडेतत्वावर चालक आणून महापालिका आपल्याच कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवत आहे.. या निर्णयामुळे महापालिकेच आर्थिक नुकसान होणार आहे, असे मागणी सुतार यांनी म्हटले आहे.