राजकारण करताना तारतम्य हवे – शरद पवार

बारामती -“राजकारण कुठं कधी करावे, याचे तारतम्य ठेवले पाहिजे’, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बारामतीला येणारे नीरा डावा कालव्याचे पाणी बंद करण्याच्या मुद्द्यावर हल्लाबोल केला आहे.

बारामती तालुक्‍यातील दुष्काळी गावांतील चारा छावण्यांची पाहणी पवारांनी बुधवारी (दि. 5) केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर आणि माजी खासदार रणजित मोहिते यांनी मंगळवारी (दि. 4) जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन नीरा डावा कालव्याचे बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याची मागणी केली होती. ती महाजन यांनी मान्य केल्यानंतर गदारोळ उडाला आहे.

यासंदर्भात पवार म्हणाले, “याप्रश्‍नी वाद वाढवू नये. राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. अशा वेळी सर्वांनी अत्यंत समंजसपणे बोलण्याची गरज आहे. राजकारण करावे पण कुठे आणि कधी याचे तारतम्य ठेवले पाहिजे. या प्रश्‍नावरून भागाभागात जिल्ह्या-जिल्ह्यात दुरावा निर्माण होऊ नये, ही काळजी घ्यायला हवी. ती माझ्याकडून घेतली जाईल.’

पाऊस पडेपर्यंत नाही, तर नवा चारा तयार होईपर्यंत जनावरांसाठी चारा छावण्या चालवाव्या लागतील. याबाबत सरकारला विनंती करू.
– शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री

Leave A Reply

Your email address will not be published.