बारामतीचे राजकारण ‘पाणी बंद’ने पेटणार

नीरा डावा कालव्यातून मिळणारे नियमबाह्य पाणी बंदचा आदेश : ऐन दुष्काळात धक्‍का

बारामती – नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा शासकीय अध्यादेशही दोन दिवसांत काढला जाणार आहे, त्यामुळे आधीच दुष्काळाने होरपळल्या बारामती तालुक्‍यातील जनतेला सरकारने एकप्रकारे धक्‍का दिला आहे. तर आगामी विधानसभेत पवारांची कोंडी करण्यासाठी सरकार आता पाण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप दबक्‍या आवाजात बारामती परिसरात होत आहे. शहरासाठी व तालुक्‍यासाठी जो कोटा ठरला आहे, तो त्याचपद्धतीने मिळेल, असे काही जणांचे म्हणणे आहे. त्यामुळे “पाणी मिळणार की नाही’ याबाबत नागरिकांसह शेतकऱ्यांच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे.

वीर, भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे 57 टक्‍के, तर डाव्या कालव्याद्वारे 43 टक्‍के पाणी वाटपाचे धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्‍यांना पाणी मिळत होते. तर डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्‍याला पाणी मिळत होते.

4 एप्रिल 2007 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात स्वतःची राजकीय ताकद वापरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवघर धरणातून 60 टक्‍के पाणी डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्‍याला व 40 टक्‍के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्‍याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करण्यात आला होता. विधान परिषदेचे सभापतीपद मिळाल्याने आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी या कराराला विरोध न करता संमती दिली होती. 3 एप्रिल 2017 ला हा करार संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे हे पाणी बारामती तालुक्‍याला दिले जात होते. हे बेकायदा जाणारे पाणी बंद करुन ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्‍यांना मिळावे, अशी मागणी माढाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती.

“त्या’ तालुक्‍यांना होणार 100% फायदा
जलसंपदा मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारे पाणी कायमचे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. याबाबतचा आदेश दोन दिवसांत काढावा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. हा अध्यादेश निघाल्यास पुणे जिल्ह्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर या धरणातून बारामती व इंदापूर तालुक्‍याला जाणारे पाणी कायमस्वरूपी बंद होऊन त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्‍यांना 100 टक्‍के होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)