माळरानावर फुलविले नंदनवन

भुसार बाजारातील व्यवसायिक म्हणजे फक्त अर्थिक गणिते ओळखणारा आणि दुकान व घरा पुरता मर्यादित असलेला माणूस अशी ओळख नठेवता या प्रतिमेला फाटा देत मार्केट यार्डमधील एका व्यापाऱ्याने सामाजिक बांधीलकी दाखवत निसर्ग प्रेम जागृत ठेवत दुष्काळात उभे राहण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे. मार्केट यार्डमधील ज्येष्ठ व्यापारी अभय संचेती यांनी केलेल्या सामाजिक कार्यातून हा आदर्श निर्माण केला आहे

त्यांनी दुष्काळी तालुक्‍यात गाईंचे संवर्धन करत काळ्या आईची सेवा अन गोमातेचे रक्षण करण्याचा आदर्श इतरासमोर ठेवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी येथे गोमातेची सेवा करण्यासाठी गोशाला फुलविली आहे. याबाबत संचेती म्हणाले, ही प्रेरणा मला येरवडा कारागृहात मिळाली. राष्ट्रसंत कमलेश मुनुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने विजय भंडारी व त्यांची सहकाऱ्यांसह येरवडा कारागृहात गोशाला सुरु केली होती. कत्तल करण्यासाठी नेल्या जाणाऱ्या गोमातांना येथे आणले जायचे. कृरतेकडून करुणेकडे या उक्तीप्रमाणे कळत-नकळत हातून गुन्हा घडल्याने शिक्षा भोगत असल्याने कैद्यांच्या मनामध्येही करुणेचा भाव जागृत व्हावा. त्यांच्या हातून गोमातेची सेवा घडावी आणि त्यांच्यावरील गुन्हेगार हा शिक्का पुसून निघावा. ही या मागची भूमिका होती.त्याला चांगले यश सुद्धा मिळाले.

या उपक्रमातून प्रेरणा घेऊन हे काम आणखी वाढविण्याचे संचेती यांनी ठरविले. पुरंदर तालुक्‍यात मावडी या गावात ओम गुरु आनंद गोशाळा सुरु केली. ते म्हणतात, रखरखत्या माळरानावर उन लागू नये, म्हणून गायींसाठी पत्र्याची शेड टाकण्यात आली. पाण्यासाठी कुपनलिका खोदण्यात आली.

रोज ताजा चारा व इतर खाद्याची व्यवस्था करून सर्व सोईयुक्त अशा गोशाळेने रूप घेतले. खर तर दुष्काळी परिस्थितीत या गाईंची सेवा करणे म्हणजे एक आव्हानच होते. पण ती जबाबदारी स्वीकारली. ऐन दुष्काळात टॅकरने पाणी विकत घेऊन आणि मागेल ते दाम देऊन चारा विकत घेऊन या गाईंचे संगोपन करण्यात आले.

अभय संचेती म्हणाले. गोशाळेनजीकच सुमारे पंधरा एकर खडकावर शेती फुलविण्याचा निर्णय केला. नजीकच्या कोरड्या पडलेल्या तलावातील सुपीक गाळ माती या खडकांवर आणून टाकण्यास त्यांनी मदत केली. पावसाचे पाणी जिरले पाहिजे या दृष्टीने प्रयत्न सुरू केला आणि त्याला चांगले यश मिळत आहे. गोशाळेसाठी संचेती यांना मोहनलाल संचेती, गजानन श्रीश्रीमळ, धनराज कटारिया, नंदकुमार चोरडिया, दिलीपकुमार दर्डा, राजेंद्र भटेवरा, जेठमल दधीच, विजय शिंगवी यांनी सहयोग दिला. गोशाळेच्या देखभालीसाठी मनीष संचेती, सोभाचंद बिनवडे सहकार्य करीत करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.