शिकाऱ्यांकडून बॉम्ब केले होते हस्तगत : कार्यालयाचे मोठे नुसकसान
पौड- पौड (ता. मुळशी) असलेल्या ताम्हिणी अभयारण्याच्या वन क्षेत्रपाल कार्यालयात डूक्कर मारण्यासाठी वापरणाऱ्या बॉम्बचा स्फोट झाला. ही दुर्घटना बुधवारी (दि. 5) पहाटे चारच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी की, मुळशी धरण विभागात असलेल्या ताम्हिणी अभयारण्य परिसरात रान डुक्कर आणि इतर हिंस्त्र प्राण्यांची शिकार कायम होत असते. या प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे छोटे बॉम्ब पौड ताम्हिणी अभयारण्य वनक्षेत्र विभागाने जप्त करून ते पौड येथील कार्यालयात आणून ठेवले होते. बुधवारी पहाटे चार सुमारास या बॉम्बचा स्फोट झाला. या झालेल्या बॉम्ब स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, कार्यालयाचे दोन्ही शटर 20 ते 30 फूट लांब जाऊन रस्त्यावर पडले. तर कार्यालयाची मोठी काच फुटून चाळीस फूट लांब जाऊन पडली. कार्यालयाच्या आत सर्व कपाटे विखरून पडलेली होती. दोन शटरच्या मधोमध असलेली भिंतसुद्ध पडली. घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस नाईक संदीप सकपाळ, संजय सुपे, ताम्हिणी अभयारण्याच्या वनक्षेत्रपाल अंकिता तरडे यांनी धाव घेतली.