सुपे, (वार्ताहर) – भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने देशातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास व्हावा,म्हणून जिल्हा,राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर केंद्र आणि राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने इन्स्पायर अवार्ड मानक योजनेचे राज्यस्तरीय प्रदर्शन दि. २३ एप्रिल ते २४ एप्रिल रोजी १२वे राज्यस्तरीय प्रदर्शन यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय कराड,सातारा येथे भरले होते.
या प्रदर्शनात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सुपे येथील श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी अनुराग संतोष जुन्नरकर याच्या प्रकल्पाची राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.
अनुरागने “डेव्हलपमेंट ऑफ पोर्टेबल युरिनल किट फॉर मेल पॅसेंजर एट ट्रॅव्हल्स/बसेस” या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. लांब पल्ल्याच्या प्रवासात पुरुष प्रवाशांसाठी लघुशंका सोय या प्रकल्पाद्वारे मांडण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनासाठी अनुरागच्या प्रकल्पाची निवड ही इतर विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणारी आहे.
या प्रकल्पासाठी विद्यालयातील विज्ञान अध्यापिका एस. बी. जगताप, एस.व्ही.चव्हाण, प्राचार्य एस. ए. लोणकर आणि विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या प्राचार्य एस. ए. लोणकर, पर्यवेक्षक बी. के. भालेराव, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी कौतुक व अभिनंदन केले.