खानवटे येथे आढळली रांजणखळी

भीमा नदीपात्रातील नैसर्गिक ठेवा 40 वर्षांनंतर उघड

भिगवण – उजनी धरणाच्या निर्मितीनंतर तब्बल 40 वर्षांनंतर भिगवण भागात भीमानदी आटली आहे. यामुळे भिगवणनजीक खानवटे (ता. दौंड) येथे नदीपात्र उघडे पडले असून शिरूर व पारनेर तालुक्‍यांच्या सीमेवरील निघोज येथील कुकडी नदीपात्रात असलेल्या रांजणखळीप्रमाणे येथे असलेली खडकांची विवरही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. यावर्षी या परिसरातील पाणीसाठा संपल्याने तसेच गाळ वाहून गेल्याने निसर्गाचा हा ठेवा पहिल्यांदाच संपूर्ण उघडा पडला आहे.

शिरूर तालुक्‍याच्या शेवटी टाकळीहाजी आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्‍याचे निघोज गावाच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहेत. नदीने वाहून आणलेले दगड-गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड-खोटे या भागात गोलगोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला थोडी-थोडकी नव्हे तर हजारो वर्षे जावी लागतात. कालांतराने या खड्ड्यांचे रांजणकार खळग्यांत रूपांतर होते. हा निसर्गाचा अदभूत चमत्कार मानता येईल. यामध्ये दगडाच्या घर्षणाने गोलाकार रांजण, घळी, कमानी तयार होतात. विशेष म्हणजे भिगवण नजीक खानवटे (ता. दौंड) येथे भीमानदी पात्रात असे खळगे तयार झाले असून गेल्या 40 वर्षात ते प्रथमच पाहायला मिळत आहेत.

या परिसरातील स्थनिकांनी दिलेल्या माहिती नुसार धरणपात्र होण्यापुर्वी याठिकाणालगत गटकळीची यात्रा भरवली जात असे. एका मोठ्या सपाट भुपृष्ठावर असलेल्या गलींमध्ये आमटी-भाताचे जेवण करण्याची प्रथा होती. इतिहासाचे अभ्यासक डॉ. दामोदर धर्मानंद कोसांबी यांनी त्यांच्या भारताचा इतिहास या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे की, येथे महामायेच्या पुजास्थानालगत अश्‍मयुगीन अर्थात दहा हजार वर्षांपुर्वीचा कालखंडातील देवता दर्शक वर्तूळे अढळली होती. यामुळे या स्थानाचे महत्व लक्षात येते. पण, हा निसर्गाचा आविष्कार अभ्यासक आणि निसर्गप्रेमींच्या दृष्टीने सध्या तरी मोठी पर्वणीच ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.