पोलीस ठाण्यालगतचे एटीएम पळवले

यवत – यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या एसबीआय बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी रोख राकमेसह लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि.21) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या एटीएममध्ये 29 लाख 63 हजार 600 रुपये होते. चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

यवत (ता. दौंड) येथे महामार्गालगत असलेल्या एका गाळ्यात हे एटीएम मशीन असून बॅंकेने सुरक्षा रक्षकाची व्यवस्था केलेली नव्हती. ई-सेक्‍युरन्स कंपनीला एटीएम सीसीटीव्हीचे काम दिलेले होते. या कंपनीचे कर्मचारी मुंबई येथील ऑफीसमधून त्यांच्या सिस्टीमद्वारे एटीएमवर नजर ठेवून कोठे चोरी होत असेल तर ते कळवित होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या एटीएम सेंटरचा दरवाजा तोडून जीपला दोरी बांधून मशीन दीडशे ते दोनशे फूट अंतरावर ओढीत नेले, त्यावेळी मशीन सेंटरमधून सायरनचा आवाज येऊ लागला तोपर्यंत एटीएम चोरट्यांनी कोणत्यातरी वाहनात टाकून पोबारा केला.

या एटीएमची यापूर्वीही चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. चोरट्यांविरोधात एटीएम चॅनल मॅनेजर माधव रघुनाथ काटकर (वय 58, रा. प्लॉट क्रमांक 2/9 मधुबन सोसायटी, फातीमानगर, हडपसर) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली असून श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.