#CWC19 : युवराज हाच माझ्या प्रेरणास्थानी- रोहित

लीड्‌स – नैपुण्य असून उपयोग नसतो. त्यास चालना देण्यासाठी कोणाची तरी प्रेरणा मिळणे आवश्‍यक असते. विशेषत: अडचणीच्या काळात मदत करणाऱ्याचे ऋण कधीही विसरले जात नाहीत. माझ्यासाठी अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग हाच प्रेरणास्थानी आहे असे भारताचा सलामीवीर रोहित शर्माने सांगितले.

तो पुढे म्हणाला की, आयपीएलमध्ये मला सुरुवातीला फारसे यश मिळत नव्हते. त्यावेळी मला युवराजशी चर्चा करण्याची संधी मिळाली. त्याने कर्करोगासारख्या दुर्घर आजारावर संघर्ष करीत मात केली आहे. त्याचा हा संघर्षच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्याने या आव्हानास कसे तोंड दिले. त्यानंतर त्याने पुन्हा कसे क्रिकेट करिअर केले, त्याकरिता त्याने कशी तंदुरुस्ती मिळविली याबाबत मी त्याच्याकडून भरपूर माहिती मिळविली. माझ्या तंत्रात कोणती चूक होत आहे, केव्हां व कशी आक्रमक फलंदाजी केली पाहिजे, क्षेत्ररक्षकांच्या डोक्‍यावरून कसे फटके मारायचे याबाबत त्याने मला बहुमोल मार्गदर्शन केले.

विश्‍वचषक स्पर्धेतील विक्रमासंबंधी रोहित म्हणाला, मी येथे कधीही विक्रमांकरिता खेळलो नाही. संघास मोठ्या धावसंख्येचा पाया रचून देणे हेच माझे सतत ध्येय असते व त्यादृष्टीनेच मी परिस्थितीनुसार फलंदाजी करतो. मला सहकाऱ्यांकडून भागीदारी करतानाच मदत मिळत असते. शिखर धवनप्रमाणेच लोकेश राहुलबरोबरही मी चांगला सुसंवाद साधला आहे. त्यामुळेच आमची जोडीही झकास जमली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)