अखेर पाचव्या दिवशी खणखणले टेलिफोन

“बीएसएनएल’चे वीज बिल थकल्याने महावितरणने केला होता वीज पुरवठा खंडित

पिंपरी – संपूर्ण भारतात “कनेकिंटग इंडिया’चा संदेश देणाऱ्या बीएसएनएल सेवेचे चिंचवड शहरात तीनतेरा वाजले होते. महावितरणकडे बीएसएनएलची लाखो रुपयाची थकबाकी असल्यामुळे महावितरणने बीएसएनएलचा विद्युत पुरवठाच खंडित केला होता. विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे मागच्या पाच दिवसांपासून “कनेक्‍टिंग इंडिया’चा संदेश देणारे बीएसएनल डिस्कनेक्‍ट झाले होते. अखेर आज दि. 16 जुलै रोजी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी वीजबिल भरल्यानंतर हा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यानंतर चिंचवड शहरातील बीएसएनएलची सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे ग्राहकांनी सुटकेचा निश्‍वास टाकला आहे.

बीएसएनएलला उतरती कळा लागल्याचे मानले जाते. अशा काळात आपल्या सेवा व्यवस्थित ठेऊन प्रतिस्पर्धेत राहणे अपेक्षित होते. परंतु बीएसएनएनलने पिंपरी-चिंचवड सारख्या औद्यागिक शहरातही आपल्या निष्काळजीपणाचा नमुना दाखवत आपल्या ग्राहकांना एक-दोन नव्हे तर तब्बल पाच दिवस त्रास दिला. महावितरणचे 2 लाख 60 हजार रुपयांचे वीज बिल दोन महिन्यापासून थकलेले असल्याने महावितरणने बीएसएनएलच्या शेवाळे सेंटरच्या टेलिफोन एक्‍सचेंजचा विद्युत पुरवठा दि. 11 जुलै रोजी खंडित करण्यात आला होता.

महावितरणकडे एप्रिल व मे महिन्याची थकबाकी भरलेली नसल्याने विद्युतपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, ग्राहकांची मोठी ओरड होवूनही मागच्या पाच दिवसात हा विद्युतपुरवठा सुरळीत करण्याच्या कसल्याही हालचाली बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी केल्या नाहीत.

अखेर ग्राहकांची ओरड वाढल्याने आज दि. 16 जुलै रोजी दुपारी थकीत रकमेपैकी 1 लाख 60 हजार रुपयाची रक्कम महावितरणला भरण्यात आली. त्यानंतर हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. अजूनही दोन महिन्यापूर्वीच्या बिलाचा दंड व जून महिन्याचे विद्युत बिल थकीत आहे. सध्या हा वीजपुरवठा चालू करण्यात आला असला तरी पुन्हा विजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार आहे.

ब्रॉडबॅण्डही बंद झाल्याने कामे ठप्प विद्युत पुरवठाच खंडित झाल्याने बीएसएनएलची लॅण्डलाईन आणि ब्रॉडबॅण्ड सेवाही खंडित झाली होती. शेवाळे सेंटरच्या टेलिफोन एक्‍सचेंजअंतर्गत शहरातील महत्वाचे पोलीस ठाणे तसेच इतर अशा 1 हजार 200 ग्राहकांचे कनेक्‍शन होते. याशिवाय 350 ब्रॉडबॅण्डची कनेक्‍शन आहेत. मात्र, 11 जुलै पासून ही सर्व कनेक्‍शन बंद पडली होती. वीजपुरवठाच बंद असल्याने टेलिफोनची यंत्रणा पूर्णपणे बंद झाली होती. परिणामी, शाळा, महाविद्यालये, बॅंका, सरकारी कार्यालये आणि कपंन्यामधील अतिमहत्वाची कामे ठप्प पडली होती. ग्राहकांना तातडीने खासगी इंटरनेटची सेवा घेणे भाग पडले होते.

एप्रिल व मे महिन्याचे विद्युत बिल भरणे बाकी असल्याने महावितरणने शेवाळे सेंटरच्या टेलिफोन एक्‍सचेंजचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. मात्र, आज बिलाच्या रकमेपैकी काही रक्कम जमा केल्यानंतर हा विद्युतपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे, सर्व ठिकाणची सेवा चालू झाली आहे.

उद्‌य गाडेकर, विभागीय अभियंता, बीएसएनएल

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)