पत्नी, मुलाला जिवे मारण्याचा प्रयत्न

“एक्‍झरबिया’कडे थकलेल्या रकमेवरून बाणेरमध्ये घडलेला प्रकार
पिंपरी – एक्‍झरबिया कन्स्ट्रक्‍शन कंपनीमध्ये रिजनल हेड या पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या घरात घुसून एका ठेकेदाराने त्यांच्या पत्नी व मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. थकलेले बिल लवकर द्यावे, म्हणून अधिकाऱ्याच्या पत्नी व मुलाचे हात बांधून मुलाच्या गळ्याला चाकूने ओरखडून जखमी केले.

हा प्रकार सोमवार दि. 15 जुलै रोजी सव्वा दोनच्या सुमारास बाणेर येथील रिजन्सी क्‍लासिक सोसायटीमध्ये घडला. याप्रकरणी कल्याणी प्रशांत लंके (वय-51) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन चेतन माळी (रा. माळी आगार हाऊस, सातपाडी, पालघर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्याणी यांचे पती एक्‍झरबिया कंन्स्ट्रक्‍शन कंपनीनेमध्ये रिजनल हेड या पदावर कार्यरत आहेत. या कंपनीच्या माध्यमातून आरोपी चेतन माळी याने रायगड जिल्ह्यातील खालपूर येथील बांधकाम केले होते. या कामाचे 4 लाख रुपयांचे बिल कंपनीनेकडे येणे बाकी होते. कंपनी हे बिल काढत नसल्याच्या कारणावरुन आरोपी चेतन माळी याने सोमवारी फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादी व त्यांच्या मुलाचे हात पाठीमागे बांधून तोंडाला चिकटटेप लावली. फिर्यादीच्या लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून तसेच गळ्याला चाकूने ओरखाडे काढून जखमी केले. कंपनीने लवकरात लवकर बिल काढले नाही तर मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली व निघून गेला. याबाबत हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंजवडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.