महिलांनी पुढाकार घेऊन काढला विहिरीतील गाळ

जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती कुटुंब नव्हे तर गाव उद्धारीची आली प्रचिती

पंचायत समितीकडून प्रतिसाद नाही

विहिरीतील गाळ काढावा, यासाठी ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महिलांनीच पुढाकार घेतला. विहिरीतील गाळ काढताना जर कोणतीही हानी झाली असती, तर याला जबाबदार कोण, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. चार वर्षांपूर्वी गाळ उपसायला गेलेल्या गावातील एका मजुराचा पाय घसरला होता. त्यात तो जबर जखमी झाला होता. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अकोले – जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती कुटुंब उद्धारी, अशी म्हण आहे. पण जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती कुटुंब नव्हे, तर गाव उद्धारी, याचाच प्रत्यय तालुक्‍यातील जहागीरदार वाडी येथे आला. येथील महिलांनी पुढाकार घेत गावातील विहीर गाळमुक्त केली. या माध्यमातून त्यांनी जगापुढे आदिवासी भागातील महिलाही किसीसे कम नही, हे कृतीतून दाखवून दिले आहे.

जहागीरदारवाडी हे आदिवासी पट्ट्यातील चारशे लोकवस्तीचे आदिवासी बहुल वस्तीचे गाव. या गावात असणारी गावकीची विहीर गाळाने भरून गेली होती. त्यामुळे येणाऱ्या पाण्याचे स्रोत बंद होऊ लागले होते. या विहिरीतील गाळ उपसण्यासाठी शासनाने मदत करावी, असा आग्रह ग्रामस्थांचा होता. मात्र शासन दरबारी मागणे मांडण्यास गावचा “ग्रामसेवक’ हाच सात ते आठ महिने फरार. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी ज्याच्याकडे कारभार सुपूर्द केला, त्याने दप्तर नाही म्हणून काखा वर केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशा पार्श्‍वभूमीवर गावातील महिलांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांची कामगिरी खरे तर शेजारी असणाऱ्या कळसूबाईच्या उंची इतकी किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अशी राहिली. या महिलांच्या योगदानाचा कित्ता इतरांनीही गिरवण्याची गरज निर्माण झाली आहे. या महिला स्वतः विहिरीत उतरल्या. गाळाच्या माड्या भरल्या. अर्थात त्यांना काही सहृदयी पुरुषांची सुद्धा मदत झाली. असे जरी असले, तरीही त्यांच्या कामाचे मोल निश्‍चितच हिमालयाच्या उंचीएवढे आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

महिना झाला या गावात नळाचे पाणी सोडण्यात आलेले नाही. गावातील माणसे वणवण पाण्यासाठी भटकत आहेत. भंडारदरा धरणामधून पाणी आणलेले आहे. पण त्या पाण्याचा जहागीरदारवाडी ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही. येथेही पाण्यावर काही लोकांचे राजकारण चालू आहे. मुळात भंडारदरा धरणात ज्या तीन गावांसाठी वीज मोटार पंप बसविण्यासाठी ब्रिज बांधला आहे, त्याचा पैसा वाया गेला आहे. कारण तो पैसा जर भंडारदरा धरणाच्या खालच्या बाजूला पाइप पसरवण्यासाठी घातला असता, तर सतत जो मोटार वीज पंप धरणामधील पाणी खाली गेल्यावर ढकलावा लागतो तो ताण वाचला असता आणि मोटार जळण्याचे प्रमाण कमी झाले असते.

या सामाजिक कामात संतोष खाडे, अंकुश करटुले, मच्छिंद्र खाडे, सुरेश घारे, एकनाथ रोंगटे आदी तरुण तसेच मंदाबाई खाडे, यमुना दराने, अंबाबाई खाडे, द्रौपदा खाडे, आशा खाडे, सुशीला भांगरे, जिजाबाई भांगरे, फसाबाई दराने, संगीता भागडे, जयश्री खाडे, मीना खाडे, गंगूबाई खाडे, झुंबरबाई खाडे, मीराबाई करटुले, जनाबाई खाडे, सुनंदा करटुले, कमल दराने, गिरीजाबाई खाडे, मीरा खाडे, अनिता खाडे, सुरेखा दराने आदी महिलांसह बहुतेक ग्रामस्थ, तरुणांनी श्रमदान करून विहिरीतील गाळ उपसा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)