सेवाभावी संस्थेचा “पाणी अन्‌ वृक्ष संवर्धनाचा’ ध्यास

पसरणी घाटात 100 सीसीटी बंधारे, वृक्षारोपणासाठी 150 खड्डे

पाचशे झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प
प्रशांत डोंगरे, महेश खरात यांच्या सेवाभावी संस्थेने यावर्षी 100 सीसीटी बंधारे व 150 झाडांचे वृक्षारोपण करण्यासाठी नियोजन केले यामध्ये शंभर पिंपळ, 100 आवळा, 100 बहावा, तर इतरही काही औषधी झाडांचे वृक्षारोपण करण्यात येवून त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करण्याचा संकल्प केला आहे.

वाई – सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती असून पावसाची सुरुवात विलंबाने होणार असल्याचे चित्र निर्माण झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पाणी संवर्धन करणे ही काळाची गरज व ते प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात वाईतील सेवाभावी संस्थेने आपले पाणी आपल्या रानीया संकल्पनेचा ध्यास घेवून पाणी अडवा पाणी जिरवाचे काम हाती घेवून संपूर्ण घाटात नैसर्गिक स्त्रोत असणाऱ्या ठिकाणी सीसीटी बंधारे तयार करून पाणी अडवून राहण्यासाठीचे नियोजन केले आहे.

यामध्ये वृक्ष संवर्धन संस्थेचा मोठा सहभाग आहे. त्याला वाईतील इतर संघटना व स्थानिक ग्रामस्थांचा व खड्डे काढण्यासाठी मुलींचा सहभाग मोठा लाभला आहे. सेवाभावी संस्थेने जवळ-जवळ शंभर सीसीटी बंधारे व दीडशे झाडांचे वृक्षारोपणासाठी खड्डे तयार केले आहेत. त्यामध्ये पावसाळ्यात पाणी साठल्यास दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई निश्‍चितच कमी होण्यास मदत होणार आहे.

वाई भागात पावसाचे प्रमाण इतर तालुक्‍याच्या मानाने चांगले असते. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण कसे राहणार हे काही दिवसांतच समजणार आहे. हवामान खात्याने धोक्‍याची घंटा वाजविल्याने त्या मानाने पाऊस कमी पडल्यास पाण्याचे दुर्भिक्ष या भागातही जाणवण्याची शक्‍यता लक्षात घेवून पाणी संचय व वृक्षारोपण करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. पसरणी घाटात मार्च, एप्रिलमध्येच पाणी टंचाई जाणविल्याने संपूर्ण घाटात याच काही संस्थांच्या माध्यमातून पक्षांना व सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी पाण्याची भांडी बांधण्यात आली आहेत. त्याचे अनुकरण इतरही तालुक्‍यातील घाटांमध्ये करण्यात आले आहे. संपूर्ण चार महिन्यात पाणी न मिळाल्याने पक्षांचा या प्राण्यांचा मृत्यू झाला नाही.

हेच या संस्थंचे मोठे यश आहे. पाणी टंचाईवर उपाय म्हणून वाईतील सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. हे बंधारे कृषी विभागाकडून बांधणे अपेक्षित असताना या विभागाकडून अशी कोणतेही नियोजन होताना दिसत नाही. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्यास त्याचा परिणाम लवकर जाणवेल. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेवून मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची गरज आहे. तरच आपले पाणी आपल्या दारी. ही संकल्पना यशस्वी होईल व कायम स्वरूपी दुष्काळ हटविण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)