“बलकवडी’तही पाण्याचा खडखडाट

रामचंद्र वीरकर पाणी संघर्ष समिती अध्यक्ष

बलकवडी धरणातून होणारा सततचा विसर्ग यामुळे पाणीपातळी दिवसेंदिवस खालवत चालली आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस न पडल्यास परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो.
पावसाने ओढ दिल्यास पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न होणार गंभीर

वाई – वाई, खंडाळा, फलटण तालुक्‍याचे तारणहार असणाऱ्या बलकवडी धरणात पाण्याचा सध्या खडखडाट झाला आहे. उर्वरित असणाऱ्या पाण्याच्या मृतसाठ्याचाही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्याने पावसाने ओढ दिल्यास जोर, गोळेवाडी, गोळेगांवसह परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. याला सर्वस्वी बलकवडी पाटबंधारे खाते जबाबदार असून पाटबंधारे खात्याने खंडाळा, फलटण, तालुक्‍यांना सोडण्यात येणारे पाणी थांबविण्यात यावे अन्यथा वाई धरण परिसरातील ग्रामस्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.

अतिवृष्टी असणाऱ्या वाईच्या पश्‍चिम भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होवून पाऊसाने वेळेवर हजेरी न लावल्यास परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो. तसेच धरण परिसरात गावांमध्ये पाण्याची टंचाई ऐन मे महिन्यात जाणवू लागली आहे. तसेच या भागातील शेतकऱ्यांना जनावरांना पाणी पाजण्यासाठी तीन किलोमीटर जावे लागत आहे. या परिसरात सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

बलकवडी धरण चार टी.एम.सी.चे धरण आहे. वाई, खंडाळा, फलटण या दुष्काळग्रस्त भागांसाठी या धरणाची उभारणी करण्यात आली आहे. बलकवडी धरणातून प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने धरण सध्या पूर्ण रिकामे झाले आहे. या धरणाच्या उभारणीत ज्यांनी त्यागाची भूमिका निभावली त्या लोकांच्या नशिबीच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्कीम पूर्ण धोक्‍यात आल्या आहेत. तरी संबंधित विभागाने या भागातील लोकांच्या त्यागाचा विचार करून पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही यासाठी उपाययोजना करावी.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती असून पाण्याचा योग्य वापर व्हावा असे पाटबंधारे खात्यालाही वाटत आहे, परंतु महामार्गाच्या खालच्या पट्ट्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अतिशय गंभीर असून पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवसांचे रोटेशन ठेवल्याशिवाय पाणी त्या भागात पोहोचत नाही यासाठी हे थोडे जादाचे रोटेशन ठेवण्यात आले आहे. तालुक्‍यात सर्वच भागातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे.

बलकवडी पाटबंधारे खाते, वाई.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×