विविध संघटनांचा उदयनराजेंना जाहिर पाठिंबा

घडशी व वडार समाजबांधवासह फर्टिलायझर्स असोसिएशन मताधिक्‍यासाठी सरसावल

सातारा – राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मित्रपक्ष यांच्या आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना जिल्हयातील विविध संघटनांकडून उत्फ़ूर्तपणे पाठिंबा मिळत आहे. आज अखिल भारतीय घडशी समाज संघ, महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ आणि कराड तालुका सिडस फ़र्टिलायझर्स ऍन्ड पेस्टी साईडस असोसिएशन या संघटनांनी लेखी स्वरुपात आपला पाठिंबा जाहीर केला असुन सलग तिसऱ्या वेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना संसदेत प्रचंड बहुमताने पाठविण्याचा निर्धार केला आहे.

याबाबत कराड तालुका सिडस फ़र्टिलायझर्स ऍन्ड पेस्टी साईडस असोसिएशन या संघटनेने प्रसिध्दीपत्रकाद्वारे महाराज साहेबांना पाठींबा दिल्याचे जाहिर केले आहे. कराड तालुक्‍यासह ठिकठिकाणच्या किटकनाशके, बी – बियाणे, आणि खत विक्रेत्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आजवर वेळोवेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सहकार्य केल्याने त्यांचे विविध प्रश्‍न मार्गी लागले असुन भविष्यातील नियोजनासाठी महाराजांचे सहकार्य लाभावे व त्यांच्या दुरदृष्टीचा संघटनेस उपयोग व्हावा म्हणून संघटनेतर्फ़े हा पाठिंबा देत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान अखिल भारतीय घडशी समाज संघ या संघटनेने या निवडणूकीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या नेतुत्वावर विश्‍वास ठेवत या निवडणूकीतील यशासाठी पूर्णपणे पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल शंकर पवार (रा. धुळदेव ता. फ़लटण) यांनी म्हटले आहे. घडशी समाजाच्या पूर्व इतिहासात शिवछत्रपतींच्या घराण्याने वेळोवेळी आशिर्वाद दिल्याच्या नोंदी आहेत. याशिवाय राजघराण्याशी हा समाज कायम एकनिष्ठ राहिला आहे. तसेच विकासाभिमुख नेतृत्व म्हणून महाराज साहेबांनी केलेले कार्य उल्लेखनिय असेच आहे.

समाजबांधवांचे विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभावे व शासकीय स्तरावर समाजाचे प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून त्यांचे नेतृत्व पुन्हा लोकसभेत निवडून जावे या उद्देशाने समाजातर्फ़े पाठींबा देत असल्याचे संघाचे उपाध्यक्ष किशोर वाडेकर, शरद धुमाळ, खजिनदार प्रदिप वाडेकर, कार्यध्यक्ष शिवाजी कदम, प्रितम धुमाळ, सुनिल पवार, हणमंतराव धुमाळ, अशोक काळे, आदींनी प्रसिध्दीपत्रकात वर सह्या करुन म्हटले आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ यांच्यावतीनेही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना पाठींबा जाहीर केला आहे. विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने आणि त्यांच्या पदाधिकारी व सदस्यांनी भरभरुन मते देण्याचे आश्‍वासन दिल्याने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मताधिक्‍क्‍यात वाढ होणार असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)