दिवसभर संततधार

ठिकठिकाणी पाणी साचले, सोसायट्यांमध्येही शिरले पाणी
पिंपरी  –
यंदा थोड्या उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनने कसर भरुन काढण्यास सुरुवात केली आहे. जास्त उसंत न घेता दिवसभर संततधार सुरू होती. पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. तर काही ठिकाणी सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये देखील पाणी शिरले होते. तसेच शहरात काही ठिकाणी वृक्ष कोसळल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. रविवारी सायंकाळी सुरु झालेल्या पावसाच्या सरी थोड्या थोड्या अंतराने सोमवारी रात्रीपर्यंत बरसतच होत्या.

शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी देखील सकाळपासूनच पिंपरी शहरासह उपनगरांमध्ये पावसाच्या सरींना सुरवात झाली. दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या. शहरातील चिंचवड, मोशी, वालेकरवाडी, चिखली, भोसरी, रावेत, दापोडी, सांगवी याभागातही दिवसभर पाऊस होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज झालेल्या पावसामुळे पिंपरी येथील नेहरुनगर, तुकाराम नगर तसेच उपनगरांमध्येही ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्‌डे चुकविताना कसरत करावी लागत होती. याशिवाय शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्यांचे स्वरुप आले होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दिवसभरात चांगला पाऊस झाल्याची नोंद शहर व उपनगरात झाली. परिसरात येत्या काही दिवसात मध्यम ते दमदार पाऊस होईन, असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

कासारवाडी, डेअरीफार्म येथे झाडे कोसळली

रविवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे शहरात ठिकठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी सकाळी पिंपरी येथील डेअरीफार्म जवळील रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. डेअरी फार्म मार्गावर कोसळलेल्या झाडामुळे चार चाकी वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप झाली होती, तर दुचाकी पदपथांवरुन जात होत्या. अशाच प्रकारे कासारवाडीमध्येही रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. सुदैवाने दोन्ही घटनेवेळी रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने कोणालाही इजा झाली नाही. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)