मृतांत एक वाघीण आणि 2 बछड्यांचा समावेश
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात 3 वाघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना चिमुर तालुक्यातील मेटेपार शेत शिवारात उघडकीस आली. मृतांत एक वाघीण आणि 2 बछड्यांचा समावेश आहे. घटनास्थळी आसपास गायीचे मृत वासरू आढळले असून त्यामुळेच वाघांवर विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना चिमूर वन परिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्रात घडली. मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ एक वाघीन आणि दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. हे बछडे आठ ते नऊ महिन्याचे आहेत. मेटेपार गावालगत असलेल्या तलावाकाठी काही युवक जांभळं तोडण्यासाठी गेले असता त्यांना तेथे वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत आढळले, अशी माहिती वन अधिकारी एस. व्ही. रामाराव यांनी दिली.
कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, जवळच गायीचे एक वासरू मृतावस्थेत आढळून आले. या वासराचे दोन पाय तुटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे या वाघिणीने व तिच्या बछड्यांनी या मृत वासराला खाल्ल्याने त्यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भाग संपन्न वन्यजीवसंपदेचा आहे. ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक कुलराज सिंग व वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 2019 या वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात 6 वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.