दिंड्याना महापालिकेडून यंदा मृदंगांची भेट

नगरसेवकांच्या मानधनातून होणार खर्च : सर्व गटनेत्यांच्या चर्चेत सहमती

दुष्काळग्रस्तानांही मदत करणार

संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांना मृदुंग भेट दिला जाणार आहे. परंतु यामुळे दुष्काळ निधी देण्याचे रद्द करण्यात आलेला नाही, अशी माहिती महापौर जाधव यांनी दिली. मृदुंग खरेदीतून शिल्लक राहिलेली रक्कम आणि इतर बाबींमधून जमा होणारी रक्कम अशी एकत्रित रक्कम दुष्काळ निधीला दिला जाणार आहे. ही रक्कम समाधानकारक असेल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

देहू, आळंदी पंढरपूरमधून होणार मृदंग खरेदी

येत्या पाच दिवसांवर आषाढीवारी येऊन ठेपली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मृदुंग खरेदी करण्यासाठी राज्यातील तीर्थक्षेत्रांमधील वारकरी सांप्रदायाच्या साहित्य व संत साहित्य विक्रीच्या दुकानांमधून मृदुंग खरेदी केले जाणार आहेत. त्याकरिता देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीन तीर्थक्षेत्रांचा विचार करण्यात आला आहे. आषाढीवारीमुळे या तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृदुंग तयार असतील, असा अंदाज आहे.

पिंपरी – आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या 750 दिंड्यांना पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने यंदा मृदुंग भेट दिला जाणार आहे. हरिकीर्तनात तल्लीन होताना या मृदुंगाचा वापर दिंड्यांच्या वतीने केला जाणार आहे. त्याकरिता येत्या दोन दिवसांत 750 मृदुंगांची खरेदी केली जाणार आहे. नगरसेवकांच्या मानधनातून हा खर्च केला जाणार आहे. महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूच्या परंपरेत खंड पडू नये, याकरिता हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

एका कार्यक्रमानिमित्त महापौर राहुल जाधव बुधवारी (दि.19) संभाजीनगर येथे आले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले आदी उपस्थित होते. त्यावेळी दिंड्यांना मृदुंग भेटवस्तू देण्यावर सहमती झाली. काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयात आषाढीवारी नियोजन आढावा बैठक पार पडली. त्यावेळी संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रमुख मानकऱ्यांनी आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना कोणतीही भेटवस्तू देऊ नये, अशी सूचना मांडली होती. त्यानंतर नगरसेवकांच्या मानधनातून जमा होणारी रक्कम दुष्काळनिधीला देण्यावर महापालिका पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले होते.

त्यामुळे महापालिकेकडून भेटवस्तू देण्याची परंपरा यंदा खंडित होण्याची शक्‍यता होती. दरम्यान, आज संभाजीनगरमध्ये झालेल्या अनौपचारिक बैठकीत आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला मृदुंग भेट दिला जाणार आहे. या मृदुंगाच्या एका नगाची किंमत अंदाजे अडीच हजार असून, असे 750 नग मृदुंग येत्या दोन दिवसांत खरेदी केले जाणार आहेत. त्याकरिता सुमारे 18 लाख 75 हजार रुपये खर्च येणार आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मानधनातून हा खर्च केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.