आम्ही शिकायचं कुठं? आता तुम्हीच सांगा…

कसणीचे विद्यालय मान्यतेअभावी बंद ; सहा गावांच्या मुलांचा टाहो
अमोल चव्हाण

ढेबेवाडी – दुर्गम व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी 2008 मध्ये निनाई देवी शिक्षण संस्थेचे कसणी येथे शामरावजी मस्कर माध्यमिक विद्यालय सुरू केले. मात्र मान्यतेअभावी शाळा बंद पडली असून येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कसणी येथे शामरावजी मस्कर माध्यमिक विद्यालय 16 जून 2008 मध्ये सुरू करण्यात आले. पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले तर 2009 मध्ये शाळेला नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात आली. यामुळे कसणीसह डोंगर पठारावरील निवी, निगडे, वरचे घोटील, सलतेवाडी, मत्रेवाडी येथील विद्यार्थ्यांची विशेषता मुलींच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय झाली होती.

या विद्यालयात एकूण 9 शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करत होते. कसणी गावाचा बृहत आराखड्यात समावेश असल्याने या शाळेला शासन मान्यता मिळेल व आपले भविष्य उजळेल, या भाबड्या आशेवर शिक्षकांनी आपल्या घरापासून कुटुंबापासून दूर राहून ज्ञानदानाचे काम केले. यामुळे अनेक मुलींना गावाजवळ शिक्षण घेता आले. संस्थेचे संथापक मारुती मस्कर यांनी शाळेला मान्यता मिळावी. म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापासून सहसंचालक कार्यालय, संचालक ऑफिस, आयुक्तालय ते मंत्रालय असे अनेक हेलपाटे मारून मान्यता मिळविण्याचा प्रयत्न केला. विद्यालयात चांगली विद्यार्थी संख्या असून शाळेला चांगली इमारत व सर्व सोयीनीयुक्त शाळा असून शाळेला मान्यता मिळणार अशी अपेक्षा होती. परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा अनधिकृत घोषित केल्याने शाळा बंद पडली आहे.

काही पालकांनी आपले पाल्य नातेवाईकांकडे शिक्षण घेण्यासाठी पाठविले आहेत. डोंगर पठारावरील पालक मुलींना शिक्षणासाठी पाठविण्यास तयार नसल्याने मुलींना शिक्षण अर्धवट सोडून घरात बसण्याची वेळ आली आहे.
शासनाने डोंगरपठारावरील शाळांना आदिवासी क्षेत्रातील शाळांप्रमाणे निकष लावून मान्यता देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी पालकातून होत आहे. गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला असून शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे कधी न भरून येणारे नुकसान टाळावे. वाल्मिक पठारावरील पानेरी, पळशी, तामिणे, आंबेघर, काहीर, हुंबरणे, आटोली, सातर, पाचगणी या गावातील विद्यार्थाना दहा-बारा किलोमीटर चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागत असून दक्षिण वाल्मिक पठारावरील गावातील विद्यार्थ्यांना सोयीचे असलेले कसणी येथील विद्यालयास कुलूप लागल्यामुळे मत्रेवाडी, वरचे घोटील, निगडे, धनगरवाडा, निवी, सलतेवाडी गावातील पालकांनी शाळा बंद झाल्याने मुलांना शिक्षणासाठी शहराकडे स्थलांतर केले आहे. मात्र ज्यांची बाहेरचे शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही. त्या विद्यार्थ्यांची शिक्षणाविना परवड झाली आहे.

शासनाने बृहत्‌ आराखड्यातील गावांमध्ये माध्यमिक शाळेस मान्यता देण्याचे सूत्र आहे. आमची शाळा सर्व निकष पूर्ण करत असतानाही 2009 पासून मान्यतेसाठी प्रयत्न करूनही उपयोग झाला नाही. अजूनही आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करत आहोत.

मारुती मस्कर संस्थापक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)