हंगामी गावाला आता हळवेपणाची किनार… चाललो आमच्या घरा

प्रा. डी. के. वैद्य /अकोले: ‘हंगामी वसाहत केलेल्या गावांना आता एकच लगबग उडाली आहे. आता हे गाव सोडून त्यांना आपल्या मायभूमीकडे, आपल्या गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. त्यामुळेच हंगामी वसाहत केलेल्या गावांना आता हळवेपणाची किनार लाभली आहे.

संपला येथला चारा !
संपला येथला निवारा !
पाठीशी ऊन-वारा !!!
चाललो आमच्या घरा !!!!
अशी काहीशी स्थिती गेले तीन दिवस ऊस वसाहत ऊसतोड कामगारांच्या अड्ड्यावर भेट दिली असता आढळून आली.

अगस्ती सहकारी साखर कारखान्यासाठी जवळपास सहा महिने ऊसतोडीसाठी आलेल्या कामगारांनी अकोले, इंदोरी, आगार, कोतूळ व अन्य गटांत आपले हंगामी गावेचं वसवली होती. या गावांमध्ये त्यांचा निवारा होता. त्यांच्या जनावरांना चारा होता. आणि एवढेच नाही, तर त्यांचा सर्वच हंगामी गावाचा या ठिकाणचा एक आपुलकीचा धागा जोडला गेला होता. परंतु अगस्ती सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस लागवड असणाऱ्या पाच गटांतील ऊस तोड संपल्याने ऊसतोड कामगारांना हंगामी गावांपासून अलविदा करण्याची वेळ आली आहे. कन्नड, औरंगाबाद, पाथर्डी, बीड व अन्य ठिकाणांहून आलेल्या ऊसतोड कामगारांना आता घरी जाण्याची अनिवार ओढ निर्माण झाली आहे. त्यामुळे ते आपल्या उभ्या असणाऱ्या कोप्या, त्यातील जीवनावश्‍यक साहित्य, गाडगी, मडकी, स्टील भांडी, टाक्‍या व अन्य जीवनावश्‍यक वस्तू बाहेर काढताना दिसून आले. प्रत्येकाच्या तोंडी आता एक हळवेपणाचे शब्द बाहेर पडत होते. ‘साहेब, आता उन्हाचा कडाका वाढला आहे. हंगाम संपला आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. म्हणून आता आम्हाला आमच्या घराकडे जाण्याची तीव्र ओढ निर्माण झाले आहे’.

पूर्वी ऊस तोड हंगाम संपल्यानंतर आपला प्रपंच गाडीमध्ये घेऊन बैलगाडी मागे बैलगाडी, त्यामागे पायी चाललेली मोठी माणसे, कारभारीण व चिली पिली गाडीत, असे चित्र दिसत होते. एकापाठोपाठ एक मुक्काम करीत करीत ऊसतोड कामगार घरी पोहोचत असत. परंतु आता बैलगाड्यांचा प्रवास थांबला आहे. कारखाना ऊसतोड कामगारांना बैलगाड्या पुरवतात. कामगार फक्त गावाकडून बैल घेऊन येतात. काहीजण तर आता ट्रॅक्‍टरच्या साह्याने ऊस वाहतूक करत असल्यामुळे बैल आणण्यासाठीचा त्यांचा प्रवास थांबला आहे. ट्रकच्या व ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने आता ऊस वाहतूक होत असल्यामुळे त्यांना आता बैलगाड्यांची ही जरुरत राहिलेली नाही. बदलत्या काळानुसार आता ट्रक किंवा ट्रॅक्‍टर यांच्या साह्याने ऊस स्थळापासून, तर कारखान्यापर्यंत वाहतूक होत असल्याने तेच चित्र आता हे कामगार घरी परतताना दिसत आहे. अशी एक आठवणीची भावना रोहिदास गिरीधर पवार या कामगाराने माहिती देताना व्यक्त केली.

स्टील, ऍल्युमिनियमची भांडीकुंडी, जनावरांचा चारा, बैल घेऊन या कामगारांचा परतीचा प्रवास पुन्हा घराकडे जाण्यासाठी सुरू झाला आहे. पण आता हा प्रवास मोठ्या ट्रकमध्ये सुरू झाल्याचे रोहिदास यांनी सांगितले. आता जमाना बदलला आहे. यंदा दुष्काळ आहे. दुष्काळात घरी ज्यांच्याकडे चारा आहे ते जनावरे घेऊन चालले आहेत. तर काहींनी निम्मे पैसे घेऊन, काहीनी खरेदीच्या मुदलात खोट खाऊन आपले बैल याच ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांना विकले आहेत, अशी माहिती रामेश्वर शंकर चव्हाण (बीड) यांनी दिली.

या गडबडीमध्ये अकोले तालुक्‍यातील माणसे खूप चांगले आहेत. त्यांच्याकडे मदतीची भावना असते. मदतीची भावना घेऊन येथील बागायतदार, शेतकरी किंवा अन्य शेतकरी सातत्याने गेली अनेक वर्ष आम्हाला मदतच करत आहेत. अशा प्रतिक्रिया अड्डा प्रमुख चव्हाण, जाधव यांनी व्यक्त केली. यंदा खूप चांगला धंदा झाला. काही काहींनी लाख लाख रुपये कसोटीला, कनवटीला बांधले. आणि घरी परत जात आहोत,’ अशा प्रकारची माहिती अलका रामचंद्र चव्हाण या महिलेने दिली.
(पूर्वार्ध )

Ads

1 COMMENT

  1. राबणारे हात !!!!
    फुलणारी मने !!!!
    काबाड कस्टाने भिजणारी शरीरे!!!!!!
    काळ्या आईची लेकरे!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)