निवडणूक मराठवाडा-खान्देशात प्रचार पिंपरी-चिंचवड शहरात

सुमारे डझनभर मतदार संघांचा निर्णय पिंपरी-चिंचवडकरांच्या हाती ?

पिंपरी – सध्या संपूर्ण देशात निवडणुकीच्या प्रचाराचा रंग चढला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही मावळ आणि शिरुर या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. मात्र, या दोन मतदारसंघाव्यतिरिक्‍त सुमारे डझनभर मतदार संघांतील उमेदवारांचे समर्थक पिंपरी-चिंचवडकरांच्या संपर्कात आहेत.

मरावाडा आणि खान्देश तसेच महाराष्ट्रातील इतर भागांमधील सुमारे एक डझन मतदार संघ असे आहेत, जिथे पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेले मतदार विजय-पराजय ठरवू शकतात. शहरात मराठवाड्यातील उमेदवारांचा प्रचारही जोरात सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. विशेतषः सोशल मीडियावर वेगवेगळे ग्रुप बनवण्यात आले असून तसेच विविध जिल्ह्याच्या शहरात असलेल्या संघटनांच्या माध्यमातून उमेदवार मतदारांशी सपंर्क साधत आहेत.

मराठवाड्यात होणाऱ्या अटी-तटीच्या लढती पाहता, व पिंपरी-चिंचवड शहरातील मराठवाड्याच्या मतदारांची संख्या विचारात घेता मराठवाड्यातील अनेक खासदार ठरवण्यात पिंपरी-चिंचवडकरांचा मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे, पिंपरी-चिंचवड शहरातील या मतदारांना आपलेसे करण्यासाठी उमेदवारांनी व त्यांच्या पक्षांनी कंबर कसली असल्याचे दिसत आहे. 18 एप्रिल रोजी मराठवाड्याच्या मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. आतापासूनच मतदारांना नेण्याची कवायत सुरू आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

शहरातील भोसरी, वाल्हेकरवाडी, आकुर्डी, चिखली या परिसरात मराठवाड्यातील नागरीक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. मराठवाड्यातील प्रचाराचा आता शेवटचा टप्पा सुरु आहे. शेवटच्या टप्प्यात तेथील उमेदवारांनी मतदारसंघात प्रचार करण्याबरोबरच मतदारसंघाबाहेर वास्तव्यास गेलेल्या मतदारांनाही आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे, साहजिकच पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या मतदारांचा शोध घेत अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते शहरात दाखल होत असून आपला उमेदवार कसा चांगला आहे. हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

चुरशीच्या लढाईत होणार फायदा

मराठवाड्यात परभणी, उस्मानाबाद तसेच बीड आणि नांदेड येथेही यावेळी चुरशीची लढत होत आहे. या लढाईत एक-एक मत निर्णायक असल्याने उमेदवार कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीत. मतदारापर्यंत सोशल मीडिया, इतर माध्यमातून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते संपर्क करीत असून मतदान करण्याचे अवाहन करीत आहेत. बाहेरगावी स्थलांतरीत झालेल्या मतदारांचा या चुरशीच्या लढाईत उमेदवारांना मोठा फायदा होणार असल्याने या मतदारांची जबाबदारी देखील स्थानिक कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. कित्येकदा उमेदवार स्वतःदेखील मराठवाड्याच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संबंध साधत आहेत.

मतदानाला नेण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स आणि गाड्यांची व्यवस्था

मराठवाड्यातील विविध लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या मतदारांचा शोध घेऊन त्यांना मतदानाला नेण्यासाठी विविध सुविधा पुरवण्यात येत आहेत. मतदारांना खाजगी ट्रॅव्हल्स तसेच खाजगी गाड्यांमधून नेण्या-आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सचे बुकींगही करण्यात येत आहेत. मतदारांपर्यंत निरोप पोहचवून त्यांना केलेली व्यवस्था कळवण्यात येत आहे. येथील मतदारांना मतदानासाठी येण्या-जाण्याला बस, खासगी ट्रॅवल्स तसेच खासगी गाड्याही उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.

मराठवाड्याचा अधिक जोर

पिंपरी-चिंचवड शहरात मराठवाडा आणि खान्देशमधील अनेक मतदार वास्तव्यास आहेत. ही संख्या लाखोंच्या घरात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये बाहेरुन आलेल्या नागरिकांमध्ये सर्वाधिक संख्या ही मराठवाडा आणि खान्देशवासयांची मानली जाते. खान्देश समाजाच्या वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार खान्देश येथील कामगार वर्ग 1980 ते 85 दरम्यान शहरात आला. गेल्या तीस वर्षांपासून येथे वास्तव्यास असल्याने बहुतेकजण हे याच शहराचे मतदार आहेत, त्यामुळे ते मतदानासाठी आपल्या गावी जाणार नाहीत. परंतु शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी नव्याने येथे आलेले तरुण मात्र मतदानासाठी गावाकडे जाणार आहे. असे असले तरी कित्येक सोशल मीडिया ग्रुपवर खान्देशच्या निवडणुकांची चर्चा होत असते आणि प्रचारही होत असतो. मराठवाड्याचे चित्र मात्र वेगळे आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठवाड्याच्या नागरिकांपैकी बहुतेक नागरीक हे अजूनही आपल्या मूळ गावाचेच मतदार आहेत. अशा मतदारांची यादी काढून तेथील उमेदवार येथेही वेगवेगळ्या मार्गाने प्रचार करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.