“लोकसभेचा निकाल म्हणजे केलेल्या कामाची पावती’

आ. मोनिकाताई राजळे यांचे प्रतिपादन

शेवगाव – राज्य आणि देशातील निकाल म्हणजे भाजपने तळमळीच्या कार्यकर्त्यांद्वारे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभ्या केलेल्या विकासाच्या रचनात्मक कामाची ही पावती असल्याचे स्पष्ट होते. जिल्हयातही पालकमंत्री ना.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानामुळे डॉ. सुजय विखे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला, त्यात आम्ही खारीचा वाटा पक्षासाठी उचलला याचे समाधान आहे. या पुढील काळात मुख्यमंत्री, ना. पंकजाताई मुंडे, पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली विकासात्मक कामे करत राहू असा विश्‍वास आ. मोनिकताई राजळे यांनी व्यक्त केला.

पाथर्डी -शेवगाव मतदारसंघातून 60 हजाराचे मताधिक्‍य खा. डॉ. सुजय विखे यांना मिळाले आहे. आम्ही 50 हजाराच्या पुढे लीड देऊ हा विश्‍वास आमचा होता, ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात शासनाच्या मदतीने मोठे कामे झाले आहेत. मतदारसंघात भाजपचे मोठे संघटन असून गावपातळीवर संघटन बांधणी व विकासकामांमुळे आम्ही आघाडी घेऊ शकलो. शेवगाव पाथर्डीच्या जनतेने विकासाला मत दिल्याने हा विजय जनतेचाच असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

केंद्र व राज्य सरकारने जनतेसाठी राबविलेल्या विविध योजना, कर्जमाफी, जलयुक्त शिवार योजना उज्वला गॅस योजना तसेच शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजना सामान्य माणसापर्यंत पोहचविल्याने जनतेने विकासाच्या बाजूने दिलेला हा कौल आहे. मतदारसंघात सध्या दुष्काळी परिस्तिथी असून पशुधन जगवणे बरोबरच पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्‍न तयार होत असून त्या दृष्टीने काम चालू आहे. मतदारसंघात भाजपा, त्याचबरोबर शिवसेना, रिपब्लिकन, राष्ट्रीय समाजवादी पक्ष व इतर मित्र पक्षाचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतल्याचे आ. राजळे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)