कचराकोंडी प्रश्नी ठेकेदाराला आठवडाभरात दोन नोटिसा 

अपुरी वाहन संख्या : कचराविषयक तक्रारींमध्ये वाढ

पिंपरी – शहरातील दक्षिण भागाच्या कचरा संकलन आणि वहन कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. ठेकेदारांनी काम सुरू केल्यापासून गेल्या आठवडाभरात शहरात कचरा उचलला जात नसल्याच्या शेकडो तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. याप्रकरणी ए.जी. एनव्हायरो या ठेकेदाराला महापालिका प्रशासनाने आठवडाभरातच दोन नोटीसा बजावल्या आहेत. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेत बैठका होत असल्या, तरीदेखील परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. करारनाम्यानुसार सुरुवातीचे सहा महिने ठेकेदारावर कारवाईच करु शकत नसल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने 1 जुलैपासून नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु केले आहे. शहरातील कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना देण्यात आले. तर, दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स यांना देण्यात आले आहे. दोन्ही कंत्राटदारांना आठ वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे.

यामध्ये ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स कंत्राटदार करत असलेल्या दक्षिण भागाच्या कचरा संकलन आणि वहन या कामाचा बोजवारा उडाला आहे. अ, ब, ग, ड आणि ह प्रभाग परिसरातील कचरा संकलनाची जबाबदारी ए.जी. एन्वायरोकडे आहे. या परिसरातील घरोघरचा कचरा संकलित केला जात नाही. वाहनांची उंची अधिक असल्याने कचरा टाकताना अडचणी येत आहेत. महिलांचा हात पुरत नसल्याने कचरा सांडत आहे. वाहनावर असलेल्या तीन कर्मचाऱ्यांच्या संख्येत एकने कपात केल्याने, कचरा उचलण्याचे काम अपेक्षित वेगाने होत नाही. ए.जी. एन्वायरो इन्फ्रा या कंत्राटदाराकडे कचरा संकलनासाठी केवळ 53 छोटी वाहने आहेत. परिसराचा विस्तार, लोकसंख्या पाहता वाहनांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे कंत्राटदाराला आणखीन 30 ते 38 वाहने वाढवावी लागणार आहेत.

ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स कंत्राटदार कचरा संकलन आणि वहन करत असलेल्या परिसरात कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. कंत्राटदाराकडे कचरा संकलनासाठी केवळ 53 वाहने असून आणखी 30 ते 38 वाहनांची आवश्‍यकता आहे. या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्याकडेचा आणि कचरा कुंडीबाहेरील कचरा उचलून वाहनात टाकणे आवश्‍यक आहे. कचरा गाडीवर एकच कर्मचारी असल्याने मोठ्या गृहनिर्माण सोसायटीतील एका माणसाने कचरा कुंडी उचलताना मदत करणे आवश्‍यक आहे. तशा सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.

डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य कार्यकारी अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)