जिल्हा परिषद शाळेतील मुलांची ओळख मंगळावर

तळेगाव ढमढेरे येथील लांडेवस्ती शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम : नासातर्फे 25 विद्यार्थ्यांची निवड

तळेगाव ढमढेरे – पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथील लांडेवस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी त्यांची नावे थेट मंगळावर कोरणार आहेत. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासातर्फे या शाळेच्या 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना प्रवासाचे बोर्डिंग पासही मिळाले आहे.

2020 मध्ये नासातर्फे मंगळाचा अभ्यास करण्यासाठी ‘मार्स रोव्हर 2020′ पाठविले जाणार असून या यानाच्या एका चीपवर या सर्व विद्यार्थ्यांची नावे असणार आहे.

विद्यार्थ्यांच्या या अंतराळ भरारीमुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. नासाचे मंगळ रोव्हर 2020 हे अंतरिक्ष यान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावणार आहे. त्यासाठी स्टेनसिल्ड चीपवर आपली नावे पाठवून आपल्या खुना सोडण्याची संधी नासाने जगभरातील नागरिकांना दिली आहे. नासाच्या संकेतस्थळावर ही नावे नोंदविता येणार आहेत.

लांडेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्‍मा शेख यांनी त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नावे नासाच्या संकेतस्थळावर नोंदवली होती. यासाठी विद्यार्थ्यांचे इमेल आयडीही त्यांनी बनविले. सर्व विद्यार्थ्यांची या मोहिमेसाठी नोंदणी झाल्याने मेल नासाने त्यांच्या मेलवर पाठविले आहेत. या प्रकल्पासाठी त्यांची नावे या यानाच्या चीपवर नोंदवले जाणार असून ती या यानाद्वारे मंगळावर पाठविली जाणार आहेत.

अमेरिकेतील अवकाश संशोधन करणारी “नासा’ ही संस्था आहे. या संस्थेच्या बाबतीत मुलांना माहिती व्हावी, अवकाश व विविध ग्रहाबद्दल विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे. यादृृष्टीने हा उपक्रम राबविल्याचे मुख्याध्यापिका शेख यांनी सांगितले. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख नानासाहेब वाजे, सहशिक्षिका विजया लोंढे यांचे मार्गदर्शन केले आहे.

प्रत्येकाला मिळणार फ्लाईंग मिलियन्स पॉईंट
नासामार्फत 2020 मध्ये “मार्स रोव्हवर 2020′ हे यान मंगळाचा अभ्यास करण्यासाठी प्रक्षेपित केले जाणार आहे. त्यातील एका चीपवर विद्यार्थ्यांची नावे स्टेन्सिल करून ती मंगळ ग्रहावर पाठविली जाणार आहेत. यासाठी प्रत्येकाला फ्लाईंग मिलियन्स पॉइंट मिळणार आहेत.

काय आहे नासाची मोहीम?
मंगळाचा अभ्यास करण्यासाठी पुढच्या वर्षी नासातर्फे मंगळावर मार्स रोव्हर 2020 ही मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळावर यान पाठविले जाणार असून, या यानाच्या एका चिपवर जगभरातील 10 लाख नागरिकांची नावे “स्टेनसिल्ड’ पद्धतीने कोरली जाणार आहेत. याची संपूर्ण माहिती नासाचे संकेतस्थळ एमएआरएस, नास, गीओव्ही यावर दिली आहे. नासाच्या कॅलिफोर्निया येथील पसाडेना जेट प्रोपोशन्सल लॅबोरेटरीतल्या “मायक्रोडिव्हायसेस लॅबोरिटीमध्ये इलेक्‍ट्रॉनिक बीम’चा वापर करून सीलीकॉनच्या चीपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्‍या म्हणजेच 75 नॅनोमीटर रुंदीत ही 10 लाख नावे नोंदविली जाणार आहेत. अशाच एका छोट्या डेमी आकाराच्या चीपवर ही नावे नोंदविण्यात येणार आहे. मार्स रोव्हर 2020 या यानाद्वारे ती मंगळावर पाठविली जाणार आहेत. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत मोहिमेसाठीही नावे पाठविता येणार आहेत. याच तालुक्‍यातील अजून एक वाबळेवाडी प्राथमिक शाळा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली असतानाच आता लांडेवस्ती प्राथमिक शाळेनेही यात भर टाकून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्‍याचे नाव जगात कोरले आहे.

माझे स्वप्न या शाळेतील मुलांमार्फत पूर्ण होत असताना आनंद होत आहे. नासाच्या मार्स रोव्हर 2020 या मोहिमेत आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड झाली, हे आमचे भाग्य आहे. लांडेवस्तीसारख्या ग्रामीण भागातील मुलांची नावे यानाद्वारे मंगळावर पोहोचणार, यावर विश्‍वासच बसत नाही, असे विद्यार्थ्यांचे पालक आमच्याशी संवाद करताना सांगत आहेत.
-रेशमा शेख, मुख्याध्यापिका लांडेवस्ती शाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)