सदस्यांच्या निधीवरून पाटणला खडाजंगी

पंचायत समिती मासिक सभा; समान निधीच्या वाटपाची मागणी 

पाटण – पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेत आज सदस्यांच्या निधीवरून जोरदार खडाजंगी झाली. मासिक सभेत अंदाजपत्रक देण्याऐवजी सात दिवस अगोदर द्यावे व सर्व सदस्यांना समान निधीचा वाटप करावे, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली. सभापती उज्ज्वला जाधव उपसभापती राजाभाऊ शेलार, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांची उपस्थिती होती.

सुरुवातीला महावितरणचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोल बदलण्याचे काम लवकरच सुरू होत आहे, त्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती देण्यात आली. यावेळी तालुक्‍यामध्ये किती पोल मंजूर झाले व ते कुठे कुठे बसवले तसेच कित्ती पोल बदलले गेले याची माहिती द्यावी अशी मागणी पंजाबराव देसाई यांनी केली. पाऊस सुरु झाला व लाईट गायब आहे असे किती दिवस चालणार आहे. कोयना विभागात सलग 24 तास वीज गायब असते असे सदस्य बबन कांबळे यांनी विचारले.

शिक्षण विभागाचा आढावा देताना नितिन जगताप यांनी, ज्या शाळा खोल्या गळत असतील त्यांनी त्वरित कळवावे असे सांगितले. तसेच शालेय मुला-मुलींना मोफत गणवेश वाटप होणार आहे. 133 शाळांची संगणक व प्रोजेक्‍टरची मागणी आहे तसेच 14 शाळांमध्ये अद्याप लाईट नाही अशी स्थिती आहे. उपशिक्षकाची 172, केंद्रप्रमुख 24 पदे रिक्त आहेत. खासगी स्कूलला विद्यार्थी जात आहे तसेच काही शाळा अव्वाच्या सव्वा डोनेशन घेत आहेत त्याबाबत शिक्षण विभागाचे काय धोरण आहे? असा प्रश्न संतोष गिरी यांनी केला. काही शिक्षक पाटण तालुक्‍यामध्ये येतात दुर्गम गाव बघतात व रजेवरती जातात हे किती दिवस चालणार? असा प्रश्न प्रतापराव देसाई यांनी केला. तोंडी आदेशावरती शिक्षक आदेश डावलतात कारण, शिक्षक संघटना अशावेळी पुढाकार घेऊन शिक्षकांना पाठिशी घालतात असे गटशिक्षण अधिकारी मीना साळुंखे यांनी सांगितले. बोंद्री शाळा पावसामध्ये गळत आहे. मुलांची बसण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सुरेश पानस्कर यांनी केली.

तालुका कृषी विभागाचा आढावा देताना तालुका कृषी अधिकारी यांनी शेततळ्या संदर्भात दोन्ही वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा. 24 जुलैपर्यंत पीक विमा योजना आहे. आरोग्य विभागाचा आढावा देताना, 906 पाणी नमुने तपासणीमध्ये 9 पाणी नमुने दूषित आढळले असल्याचे सांगण्यात आले. यानंतर मरळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सगळा कर्मचारी वर्ग असूनही खासगी दवाखान्यामध्ये लोक जातात. शासन लाखो रुपये या कर्मचारी व आरोग्य केंद्रांवरती वाया घालवत आहे परंतु हे मरळी आरोग्य केंद्रातील कर्मचारी करतात काय काम? असा अभ्यासपूर्ण आराखडा संतोष गिरी यांनी मांडला. व मरळी आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी तात्काळ बदलावा अशी मागणीही यांनी यावेळी केली. यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)