ग्रामीण स्त्रियांमधला “वित्तीय’ आत्मविश्‍वास

गटांमधून कर्ज घेऊन स्त्रियाच एकमेकींना जामीन राहिल्या कारण त्यांच्याकडे तारण ठेवायला काहीच नव्हतं. गरजू व अल्प-उत्पन्न गटातल्या स्त्रियांना बॅंकेत यायला जागाच नव्हती. नाइलाजाने त्यांचा कल सावकाराकडे वळला व त्या 24 आणि 32 टक्के एवढं महागडं कर्ज घेऊ लागल्या. त्यात त्या समाधानीही होत्या, कारण कर्ज वेळेत मिळत होतं, शिवाय कागदपत्रांची पूर्तताही करावी लागत नव्हती.

हे चित्र आठवडी बाजारात व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमध्ये जास्त दिसत होतं. आठवडी बाजार म्हणजे ग्रामीण भागातील असं ठिकाण जिथे जास्तीत जास्त पैशांची उलाढाल होते. या स्त्रियांना बॅंकिंग प्रवाहात आणण्यासाठी आम्ही पाच स्त्रियांचा गट केला. “आम्ही एकमेकांना साथ देऊ आणि एकमेकींना जामीन राहू’ या तत्त्वावर कर्ज दिलं. कर्जाची वेळेत परतफेड करून स्त्रियांनी ते सिद्धपण करून दाखवलं. आम्हाला तिथे व्यवसाय दिसायला लागला. बचतगटामार्फत घेतलेल्या कर्जाच्या पैशांचा स्त्रियांनी कुठे वापर केला? तर, स्त्रियांनी त्याचा वापर मुला-मुलींच्या शिक्षणासाठी केला. पण यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांनी बॅंकेचे व्यवहार करण्यास सुरुवात केली आणि घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून “आम्हीही बॅंकेबल आहोत. आम्ही व्यवसाय करण्यालायक आहोत’, हे स्त्रियांनी दाखवून दिलं.

या ग्रामीण स्त्रियांना कशा पद्धतीचं कर्ज
लागेल, कशा पद्धतीने त्यांचा बॅंकेच्या व्यवहारांमध्ये समावेश करावा यासाठी बॅंकांनी संशोधन केल्याचं फारसं आढळून आलेलं नाही. मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की, बॅंकिंग इंडिस्ट्रीने संशोधन करून आपल्या ग्राहकांच्या गरजेप्रमाणे बचतीच्या आणि कर्जाच्या नवीन योजना अमलात आणल्या पाहिजेत. आमच्या अनुभवाप्रमाणे, 2 बचतगटांतून स्त्रिया 2 वर्ष कर्ज घेऊ शकतात आणि त्यानंतर त्यांची पात्रता इतकी वाढते की त्या वैयक्तिक तसंच मोठ्या कर्जाची मागणी करू लागतात.

शहरातून गावाकडे..
दुष्काळग्रस्त भागातील असल्यामुळे विजय यांच्या आंदोलनासाठी सतत बैठका चालू असत. म्हसवडला आल्यावर जाणवलं की आपण खूप व्यापक विचार करतो आहोत. समाजपरिवर्तनाचा लढा पुकारतो, बदल घडवायचा आहे, असं सांगतो पण रोजच्या जीवनात ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे तर किती छोटे-छोटे प्रश्‍न असतात आणि ते त्यांचे हक्कही असतात.

म्हणजे संडास असणे, ही स्त्रियांसाठी हक्काची गोष्ट आहे. त्याच्यासाठी लढा द्यावा लागावा? अशा परिस्थितीत काम करताना मी विचलित व्हायची. असं वाटायचं की आपण असं कसं काम करू शकणार? पण शेवटी मनाशी पक्कं केलं की हे रोजचे छोटे-छोटे प्रश्‍न आहेत ते सोडवता-सोडवताच खरी परिवर्तनाची लढाई उभी राहील. आणि यातूनच स्थापना झाली ती माणदेशी फाऊंडेशनची..”सांगताहेत माणदेश बॅंकेची स्थापना करून स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्यभान देणाऱ्या चेतना सिन्हा.

पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांसाठी विशेषत: निम्न आर्थिक वर्गातील स्त्रियांमध्ये आर्थिक भान यावे, त्यांना उद्योगांसाठी कर्जे मिळावीत यासाठी पहिली बॅंक काढणाऱ्या चेतना सिन्हा. या बॅंकेचे वैशिष्ट्य म्हणजे ती स्त्रियाच चालवतात. स्त्री-उद्योजिकांना आधारभूत ठरेल यासाठी त्यांनी “वूमन चेंबर ऑफ कॉमर्स’चीही स्थापना केली, त्याचबरोबरीने उद्योजकतेचे प्रशिक्षण देता यावे यासाठी या ग्रामीण स्त्रियांसाठी बिझनेस स्कूलचीही स्थापना त्यांनी केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच माणदेशीतील स्त्रिया आर्थिक स्वतंत्र झाल्या आहेत. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

बॅंकेची स्थापना
स्त्रियांच्या हाताला काम देऊन त्यांच्या हातात पसा कसा खेळेल हा विचार मनात डोकावू लागला. कारण स्त्रियांच्या हातात पसा आला की तो घरासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च होणार, त्यामुळे पशांवर स्त्रियांचे नियंत्रण राहावे यावर भर होता. स्त्रियांचे उत्पन्न कितीही असले तरी स्त्रिया बचत करण्यास इच्छुक असतात हे चित्र समोर आले. छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना बचत करायची होती, ती पण छोटी छोटी. अशा बायकांची खाती उघडण्यास कोणतीही बॅंक तयार होत नव्हती. यासाठी स्वत:चीच बॅंक असावी अशी कल्पना स्त्रियांनीच मांडली. कष्टकरी/मोलमजुरी करणाऱ्या स्त्रियांसाठी बॅंक काढायची, हा निर्णय पक्का झाला.

ग्रामीण भागातील स्त्रिया
कुठला व्यवसाय करू शकतात. कशा प्रकारे त्यांचा विकास करता येईल? त्या जोखीम घेऊन त्यांची “बिझनेस वुमन’ बनण्याची तयारी आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास त्या उत्सुक आहेत. आज माणदेशी उद्योगिनी (बिझनेस स्कूल) मधून प्रशिक्षण घेऊन अनेक स्त्रिया शेळी डॉक्‍टर, सायकल रिपेरिंग, बायोमास, टू-व्हीलर रिपेअरिग, केबल नेटवर्किंग, मशरूम लागवड, रेशीमउद्योग, रोपवाटिका, कॅटिरग, सुतारकाम, कुंभारकाम, बांबू वर्क यासारख्या व्यवसायात उतरल्या आहेत.

स्त्रिया माणदेशी “टोल फ्री’ क्रमांकाचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायनिगडित अडचणींवरदेखील पर्याय काढत आहेत. एवढेच नव्हे तर त्या “मोबाइल ऍप’चा वापरदेखील आत्मविश्‍वासाने करीत आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये आपण बघितलं तर स्त्रियांनी बचतगटांमार्फत कर्ज घेतलं आणि बचतीसुद्धा केल्या. बऱ्याच वित्त संस्था स्त्रियांना बचत आणि कर्जाच्या सुविधा देण्यास पुढे सरसावल्या. यामुळे ज्या स्त्रिया बॅंकिंग सुविधेपासून वंचित राहिल्या होत्या त्या स्त्रियांनादेखील बॅंकेकडून कर्ज मिळायला लागलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)