संगमनेर – नादुरुस्त असलेल्या उभ्या ट्रकला स्टील वाहून नेणाऱ्या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की स्टील ट्रकची बॉडी तोडून बाहेर आले. त्यामुळे ट्रक चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. हा अपघात मंगळवारी (दि. 9) रात्री बाराच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर अमृतनगर येथील माझे घर हौसिंगजवळ घडला. नाशिक-पुणे महामार्गावर माझे घर सोसायटीसमोर रस्त्याच्या कडेला एक खताच्या गोण्यांनी भरलेला नादुरुस्त मालट्रक (एमएच- 20 सीटी- 0185) उभा होता.
दरम्यान रात्री बाराच्या सुमारास नाशिककडून पुण्याकडे ट्रक (क्र. एमएच- 15, सीके- 4789) स्टील घेऊन चालला होता. बंद पडलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने स्टीलचा ट्रक त्यावर आदळला. ही धडक एवढी जोराची होती की स्टील चालकाची कॅबीन तोडून बाहेर आले. त्यामुळे चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन या जखमी चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅस कटरच्या साह्याने कॅबीन तोडून त्याला बाहेर काढावे लागले. जखमी चालकास त्वरित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.