धोकादायक वीजवाहक तारा हटवण्याची मागणी

कोपर्डेहवेली – शिरवडे रेल्वे स्टेशन येथील धोकादायक वीजवाहक तारा हटविण्याबाबत वेळोवेळी मागणी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्‍त होत आहे.
शिरवडे रेल्वे स्टेशन येथून जवळच शिरवडे येथील शेतकरी उत्तम बोराटे यांची शेतजमीन असून त्यांच्या शेतामधून महावितरण कंपनीच्या वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. दोन खांबामधील अंतर नियमापेक्षा जास्त असल्यामुळे या तारा प्रमाणापेक्षा जास्त खाली आलेल्या आहेत. शेतामध्ये सात ते आठ फूट उंचीवर असलेल्या तारांमुळे शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.

त्याचबरोबर शेतमशागती दरम्यान ट्रॅक्‍टर सारख्या वाहनांचा अनावधानाने वीजवाहक तारांचा स्पर्श झाल्यास जीवित व वित्तहानी होण्याचा धोका संभवतो. याठिकाणी असलेल्या वीजवाहक तारा पूर्णपणे जिर्ण झालेल्या असून या तारांना चार-चार ठिकाणी जोड देण्यात आहेत. मागील वर्षी याच ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्यामुळे नडशी, शिरवडे, कोणेगाव व मसूर या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. शेतकरी व नागरिकांनी या धोकादायक तारा बदलण्यासाठी पाठपुरावा करूनही परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून महावितरण विभागाने याची नोंद घेऊन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)