शहरातून कॉंग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर

File photo

ठराविक नेते आणि कार्यकर्ते वगळता पक्षाकडे वानवा

चिंचवडचा उमेदवार कोण?

आघाडीच्या जागावाटपात शहरातील तीन पैकी चिंचवड हा विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहे. 2014 साली दोन्ही कॉंग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. त्यामुळे आता नव्याने जागावाटपात चिंचवड मतदारसंघ पक्षाकडे आल्यास या ठिकाणी विजयी होईल असा उमेदवार सध्यातरी दृष्टीक्षेपात नाही. त्यामुळे कॉंग्रेस चिंचवडवर दावा करणार की हा मतदारसंघही राष्ट्रवादीच्याच वाट्याला जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरावर एकेकाळी एकहाती वर्चस्व राखणारी राष्ट्रीय कॉंग्रेस शहरातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सचिन साठे यांच्यासह एकदोन नेतेमंडळी आणि त्यांचे ठराविक कार्यकर्ते वगळता या पक्षाची शहरात ताकदच राहिली नसल्याचे लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. गयारामांची लागण झालेली कॉंग्रेस गेली 20 वर्षे आपली गळती रोखू शकली नाही. त्यातच राष्ट्रीय पातळीपासून शहर पातळीपर्यंत या पक्षाचा जनाधार संपुष्टात येऊ लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात या पक्षाची ताकद नगण्य उरली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा शहर पातळीवरील कॉंग्रेसला पहिले खिंडार पडले. 1999 साली या पक्षाची सुरू झालेली गळती रोखण्यात आजपर्यंत शहर, जिल्हा अथवा राज्यपातळीवरील नेत्यांना यश आलेले नाही. पिंपरी-चिंचवड शहरावर कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी एकहाती वर्चस्व राखले होते.

शहरवासियांनीही कॉंग्रेसवर भरभरून प्रेम केले. मात्र 1999 साली कॉंग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली आणि शहरातील कॉंग्रेसला गळती लागली. गजानन बाबर यांचा अपवाद वगळता शहरातील मतदारांनी कॉंग्रेस नेत्यांनाच साथ दिली. मात्र राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीची साथ धरल्याने कॉंग्रेसला मोठा फटका बसला. दरम्यान रामकृष्ण मोरे हयात असे पर्यंत कॉंग्रेसला सुगीचे दिवस कायम राहिले.

त्यानंतर निर्माण झालेले गटतट, जिल्हा आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी केलेले दुर्लक्ष, स्थानिकांना न मिळालेली ताकद आणि हातातून गेलेली सत्ता यामुळे एक-एक करून कॉंग्रेसचे सर्वच नेते राष्ट्रवादी व इतर पक्षाचे गेले. त्यातच अजित पवार यांनी कॉंग्रेस संपविण्याचा चंग बांधल्याने या पक्षाची वाताहत झाली. सध्या सचिन साठे, माजी नगरसेवक कैलास कदम, नरेंद्र बनसोडे, मनोज कांबळे, मयूर जैस्वाल, शामला सोनवणे, शीतल सोनवणे, गौतम आरकडे, सुंदर कांबळे इतकीच नेतेमंडळी पक्षाकडे राहिली आहेत. यातील काही मंडळींनाच जनाधार असल्याने पक्षाची ताकद संपुष्टातच आल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)