उमेदवाराच्या अनुपस्थितीत महायुतीचा संकल्पनामा

जुन्याच मुद्यांचा नव्याने समावेश

पिंपरी –
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा जाहीरनामा पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज प्रसिद्ध केला. महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवाराच्या अपुपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. शहरातील आजपर्यंत सत्ताधाऱ्यांना सोडविण्यात यश न आलेले आणि केवळ राजकारण म्हणून वापर करण्यात आलेल्याच जुन्या अनेक मुद्यांचा यामध्ये समावेश आहे. हजारो कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा प्रश्‍न असलेल्या एचए कंपनीच्या पुर्नरुज्जीवनाचा मुद्दा केवळ एका वाक्‍यात मांडण्यात आला आहे. जुनेच प्रश्‍न आणि नव्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

मावळचे महायुतीचे उमेदवार बारणे यांच्यासाठी गिरीश बापट यांनी आज भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानंतर जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. याला संकल्पनामा असे नाव देण्यात आले आहे. यात नवी मुंबई विमानतळ, रेल्वे सुविधा, तरुणांसाठी रोजगार, औद्योगिक धोरण, शैक्षणिक धोरण, अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न, रेडझोन, आयटी सुविधा, लघुउद्योग आणि कामगारांचे प्रश्‍न, नदी सुधारणा प्रकल्प, पर्यटन, बंदर विकास आणि झोपडपट्टी पुनर्वसन यांचा उहापोह करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे शहराशी निगडीत हेच मुद्दे यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतही प्रचाराचे ठळक मुद्दे होते. पूर्वीचे शिवसेना खासदार गजानन बाबर यांनीही 2009 साली याच मुद्यांच्या प्रश्‍नावर निवडणूक लढविली होती.
पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते.

येथील उद्योजकांनी आजपर्यंत अनेक मागण्या केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुन्हा तेच ते मुद्दे वचननाम्यात मांडण्यात आले आहेत. तर गेल्या 24 महिन्यांपासून ज्या “एचए’च्या कामगारांना पगार देखील मिळत नाही, त्यांच्यावर केवळ एका वाक्‍यात भाष्य करण्यात आले आहे. एचएचे हजारो कामगार गेल्या अनेक महिन्यांपासून अडचणीत असताना त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. आयटीच्या कामगारांसाठी अथवा कंपन्यांसाठी एकही काम गेल्या पाच वर्षांत झालेले नाही मात्र त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचा उल्लेखही करण्यात आला आहे. मात्र हा मुद्दादेखील गेल्या पाच वर्षांत सर्व्हेपेक्षा अधिक झालेला नाही. नदी सुधार प्रकल्पाचे गेल्या दहा वर्षांपासून शहरवासियांना गाजर दाखविण्यात येत असून आता पुन्हा नव्याने तोच मुद्दा वचननाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. रेडझोनचा मुद्दा सोडविण्याचे पुन्हा आश्‍वासन देवून जुन्याच प्रश्‍नाला नव्याने मुलामा देण्यात आला आहे.

आश्‍वासनाचे सोडा काय केले ते सांगा- शिंदे

उद्योगांच्या बाबतीत संकल्पनाम्यात केलेल्या आश्‍वासनांबद्दल उद्योग क्षेत्रातून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज ऍण्ड कॉमर्सचे अध्यक्ष ऍड. अप्पासाहेब शिंदे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, प्रत्येकवेळी तेच ती आश्‍वासने देवून जनतेची फसवणूक करणाऱ्या खासदारांनी काढलेला वचननामा ही उद्योजकांची शुद्ध फसवणूक आहे. पाच वर्षांमध्ये हे सर्व करता आले असते. उद्योगांच्या स्थानिक समस्यांबाबत पालकमंत्र्यांना एक पुस्तक तयार करुन देण्यात आले होते. अद्याप एकही समस्या सोडवण्यात आली नाही. पाच वर्षांमध्ये सर्वत्र सत्ता असताना ही सर्व आश्‍वासने तेव्हाच पूर्ण करता आली असता परत तीच आश्‍वासने का देत आहेत? खासदारांसह पालकमंत्री गिरीश बापट यांनी उद्योजकांचा कोणता प्रश्‍न सोडविला हे सांगणे गरजचे असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)