बापटांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – मोहन जोशी

पुणे – “पुण्याच्या पाणी पुरवठ्याचा खेळखंडोबा करणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापटांनी त्यांची अकार्यक्षमता लक्षात घेऊन त्वरीत राजीनामा द्यावा,’ अशी मागणी कॉंग्रेस नेते मोहन जोशी यांनी केली आहे.

पुणे महानगरपालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना पाण्याचे उत्तम नियोजन केल्यामुळे पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही, असा दावा करत अकार्यक्षम पालकमंत्र्यांनी पाण्याच्या नियोजनाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे आता दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ पुणेकरांवर येणार असल्याची टीका जोशी यांनी केली आहे. गेल्या 5 वर्षात पालकमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द पूर्णपणे अपयशी ठरली असून, त्याचे दुष्परिणाम पुणेकरांना भोगावे लागत असल्याचा आरोपही जोशी यांनी केला आहे.

पुण्यातील मतदान 23 एप्रिल रोजी झाले; तर पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदार संघात येतो, तेथे 29 एप्रिल रोजी मतदान आहे. पालकमंत्री बापट यांच्या निष्क्रियतेमुळे पुणेकरांवर पाणी कपात लादली जाणार आहे. त्याचा मतदानावर प्रतिकूल परिणाम होईल हे लक्षात घेऊन पुण्याची पाणी कपात दोन मे पासून करण्याची चलाखी या निष्क्रिय पालकमंत्रांनी केली आहे, असा आरोपही जोशी यांनी केला आहे.

पुणेकरांबद्दल त्यांना अजिबात आस्था नाही, हे त्यांनी यावेळी देखील दाखवून दिले आहे. आता पुणेकरांनी त्यांचा राजीनामा मागावा. अशा निष्क्रिय आणि झोपी गेलेल्या चौकीदाराचा पुणेकरांना काहीच उपयोग नाही, असेही जोशी यांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.