लंडन – पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिक याने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर आपण निवृत्त होणार असल्याचे त्याने स्पर्धेपूर्वी संकेत दिले होते. या स्पर्धेत त्याची कामगिरी निराशाजनक झाली होती. टी-20 सामन्यांमध्ये मात्र काही काळ तो खेळणार आहे.
मलिक याने एक दिवसीय 287 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये त्याने 7 हजार 534 धावा केल्या. त्यामध्ये त्याने नऊ शतके ठोकली. त्याने उपयुक्त फिरकी गोलंदाज म्हणून जबाबदारी सांभाळताना 158 विकेट्स घेतल्या. येथील विश्वचषक स्पर्धेत त्याने भारताविरूद्धच्या सामन्यात भाग घेतला. हा त्याचा कारकीर्दीतील अखेरचा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना होता. या स्पर्धेतील तीन सामन्यांमध्ये त्याला भाग घेण्याची संधी मिळाली. त्यापैकी दोन सामन्यांमध्ये त्याला भोपळाही फोडता आला नाही.
मलिक याने सांगितले की, माझ्यासाठी स्पर्धेचे हे स्वरूप आवडते होते. दुर्देवाने आम्ही धावगतीमध्ये कमी पडलो व बाद फेरीत आम्हाला स्थान मिळविता आले नाही. आजपर्यंतच्या कामगिरीबाबत मी खूप समाधानी आहे. एक दिवसीय 41 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून मी काम केले. आमच्या संघास बिजय मिळविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न केले. पुढील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यासाठी मी लक्ष केंद्रीत करणार आहे. तसेच माझ्या कुटुंबियांसाठी मी वेळ देणार आहे.
विश्वचषक स्पर्धेत मलिकची कामगिरी निराशाजनक झाली. त्याबाबत तो म्हणाला, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाने टाकलेल्या अप्रतिम चेंडूवरच मी बाद झालो. केवळ दोन तीन सामन्यांमधील कामगिरीवरून एखाद्यावर टीका करणे अयोग्य असते. तरीही मी गेल्या 20 वर्षाच्या कारकीर्दीत संघासाठीच खेळण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत खेळलो.