राहुल गांधी यांना जामीन मंजुर

पाटणा – वादग्रस्त वक्‍तव्य केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना आज पाटणा न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. कर्नाटकमधील एका जाहीर सभेत राहुल गांधी यांनी “सर्वच चो-यांचे नाव मोदी का असते?’ असे विधान केले होते. याविरोधात बिहारचे उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता.

याप्रकरणी पाटणा न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी कुमार गुंजन यांच्यासमोर आज सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला. तसेच पुढील सुनावणी 8 ऑगस्ट रोजी निश्‍चित केली आहे.

या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, देशातील गरीबीविरोधातील माझा लढा कायम राहणार आहे. देशाच्या गरीब, शेतकरी आणि कामगारांच्या लढयासाठी मी बांधील आहे. मी त्यांच्याबरोबर एकता व्यक्त करण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्या मोदी सरकार विरोधात काही बोलल्यास संबंधीतांचा आवाज दाबल्या जातो. त्यांच्या विरोधात भाजप आणि आरएसएसकडून खटले दाखल करण्यात येतात. असा प्रकारे खटले दाखल करून राजकीय विरोधक दबाव निर्माण करून झळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांच्यापुढे झुकणार नसुन माझा लढा सुरूच ठेवणार आहे. तसेच याबाबत न्यायालयात अपिल दाखल करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, राहुल गांधींच्या समर्थनार्थ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. राहुल गांधी यांनी दिलेला राजीनामा परत घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.