शिरूर, मावळसाठी आज होणार मतदान

शिरूर 23, मावळातून 21 उमेदवार रिंगणात


प्रत्येक मतदान केंद्रांवर दोन ईव्हीएम उपलब्ध


सकाळी 7 वाजेपासून सुरू होणार मतदान

पुणे – शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.29) मतदान होणार आहे. शिरूर मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ. अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे श्रीरंग बारणे आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पार्थ पवार निवडणूक लढवित आहे. मतदानासाठी शिरूर आणि मावळ मतदारसंघात एकूण 4 हजार 800 मतदान केंद्र असून दोन्ही मतदारसंघात एकूण 44 लाख 70 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

पुरेशा संख्येने इव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशीन), व्हीव्हीपॅट (वोटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मतयंत्रांची उपलब्धता, निवडणूक कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्ताचे नियोजन, संवेदनशील केंद्रांवर वेबकास्टिंग, टपाली मतदानाची सोय, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आणि भरारी पथकांची नियुक्ती, अशी चोख तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. मतदारांना सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. शिरूर मतदारसंघातून 23 उमेदवार, तर मावळ लोकसभा मतदारसंघातून 21 उमेदवार निवडणूक लढवित आहे. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक मतदान केंद्रांवर दोन ईव्हीएम उपलब्ध राहणार आहे.

शिरूर मतदारसंघात 47 मतदान केंद्र तर मावळ लोकसभा मतदारसंघात 31 मतदान केंद्र संवेदनशील आहे. याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. मतदानासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण रविवारी सकाळी देण्यात आले. त्यानंतर दुपारनंतर सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर पोहोचले. मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी मतदान केंद्रावर आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शिरूर लोकसभा मतदारसंघ
* एकूण मतदार – 21 लाख 73 हजार 424
* एकूण मतदान केंद्र – 2296
* संवेदनशील मतदान केंद्र -31
* भरारी पथके – 27

मावळ लोकसभा मतदारसंघ
* एकूण मतदार – 22 लाख 97 हजार 405
* एकूण मतदान केंद्र – 2504
* संवेदनशील मतदान केंद्र – 47
* भरारी पथके – 19

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)