भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून दोन्ही देशांमध्ये टी-२० मालिका सुरु आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेली आहे. टीम इंडियाने पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात ६५ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता भारत या ३ टी-२० सामान्यांच्या मालिकेत १-० अशा फरकाने आघाडीवर आहे. यजमानांविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा सूर्यकुमार यादवने जबरदस्त शतकीय खेळी केली. त्याने सामन्यात ५१ चेंडूत १११ धावांची तुफानी खेळी खेळली.
#NZvsIND | “तो खेळतो तसे शॉट्स मी कधीही पाहिले नाहीत” विल्यमसनकडून सूर्याचे कौतुक!
रोहितने ट्विटमध्ये काय लिहिले होते?
दरम्यान, न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील सूर्यकुमारच्या शतकीय खेळीनंतर रोहित शर्माचे एक ११ वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये रोहितने सूर्यकुमार यादवबाबत एक भविष्यवाणी केल्याचे दिसत आहे. रोहितने लिहिले की,”चेन्नईत बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा नुकताच संपला. काही प्रतिभाशाली क्रिकेटपटू येणार आहेत. मुंबईचा सूर्यकुमार यादव असा फलंदाज असेल, ज्याच्यावर भविष्यात सर्वांची नजर असेल.” रोहितच्या याच भविष्यवाणीची सध्या चर्चा सुरु आहे.
२०२२ वर्षात सूर्यकुमारचे वर्चस्व
सूर्यकुमार यादवसाठी २०२२ हे वर्ष खास राहिले आहे. इतर खेळाडूंच्या तुलनेत त्याने खूपच कमी कालावधीत टी-२० क्रिकेटमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. सध्या तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने या वर्षभरात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याचबरोबर सूर्यकुमारने एकाच वर्षात २ टी-२० शतकं ठोकले आहेत. टी-२० विश्वचषकात सूर्यकुमारने भारतासाठी विराट कोहलीनंतर दुसऱ्या सर्वाधिक धावा केल्या आहेत.