सुवर्णपदकासह राही सरनौबत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

सौरभ तिवारीची विश्‍वविक्रमासह सुवर्ण कामगिरी

म्यूनिच – राही सरनोबतने म्यूनिच येथे सुरु असलेल्या तिसऱ्या आयएसएसएफ विश्‍वचषक स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक जिंकले. यासह राहीने ऑलिम्पिक कोटाही मिळवला. त्याचवेळी, भारताचा युवा नेमबाज सौरभ तिवारी याने पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे सौरभने नवीन विश्‍वविक्रम नोंदविला आहे. तर, आशियाई क्रीडा स्पर्धेची विजेती राहीने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा विश्वचषक सुवर्ण पदक पटकावले. तिच्या जोरावर भारताने टोकियो ऑलिम्पिकसाठी सहावे तिकिट पक्के केले.

नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत राहीने 25 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. राहीसोबत भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरीनेही पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. म्यूनिच येथील स्पर्धेत राहीसोबत मनू भाकेरचाही समावेश होता. अंतिम फेरीत मनूने राहीच्या तुलनेत चांगली सुरुवात करत आघाडीही घेतली होती, मात्र सातव्या फेरीत तिच्या बंदुकीमध्ये बिघाड झाला आणि मनू पिछाडीवर पडली. मात्र राहीने आपल्या कामगिरीत सातत्य कायम राखत सुवर्णपदकावर मोहर उमटवली.

यावेळी झालेल्या सामन्यात सहाव्या फेरीपर्यंत मनू, राही आणि युक्रेनची ओलेना कोस्टिविच प्रत्येकी 21 गुणांसह आघाडीवर होत्या. मात्र सातव्या फेरीत बंदुकीमध्ये बिघाड झाल्याने मनू पाचव्या स्थानी घसरली आणि स्पर्धेबाहेर पडली. मात्र, राहीने कामगिरीत सातत्य राखताना आठव्या व नवव्या फेरीत परफेक्‍ट पाच वेध घेतले. तिने 37 गुणांसह सुवर्ण जिंकले, तर ओलेनाला 36 गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. बल्गेरियाच्या एंटोनेटा बोनेवाने 26 गुणांसह कांस्य जिंकले.

भारतीय संघ या स्पर्धेत, 3 सुवर्ण पदकांसह आघाडीवर असून चीन एक सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्य पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.

तत्पूर्वी, मेरठच्या 17 वर्षीय चौधरीने अंतिम फेरीमध्ये 246.3 गुण नोंदवले. अशा प्रकारे त्याने फेब्रुवारीत नवी दिल्ली येथे विश्वचषकातील स्वत: केलेला 245 गुणांचा विक्रम मोडीत काढला. चौधरीने याआधीच टोकियो ऑलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केलेला आहे. दहा मीटर एअर पिस्टलमध्ये रशियाच्या आर्तम चेरसुनोवने रौप्य आणि चीनच्या वेई पेंगने कांस्यपदक जिंकले. चौधरीने अंतिम फेरीत पहिल्या शॉटमध्ये 9.3 गुण मिळवले; परंतु त्यानंतर सलग पाच शॉटमध्ये त्याने 10.1 गुणांची नोंद केली.

पहिल्या फेरीनंतर तो चेरसुनोव्हाच्या तुलनेत 0.6 गुणांनी पिछाडीवर होता. दुसजया फेरीत मात्र त्याने आघाडी मिळवली. त्यात त्याने तीन शॉटमध्ये 10 पेक्षा कमी गुण मिळवले; परंतु दोन शॉटमध्ये सलग 10.7 गुणांची कमाई केली. भारतीय नेमबाजाने त्यानंतर प्रत्येक एलिमिनेशनमध्ये आघाडी कायम ठेवली. त्याने अखेरीस 10.3 चे दोन शॉट, तर एक शॉट 10.7 चा लगावला. चौधरीचा अखेरचा शॉट 10.6 चा होता. त्यात तो स्वत:चा विक्रम मोडण्यात यशस्वी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)