मोदींच्या शपथविधीनंतर विखे-पाटलांचा भाजप – प्रवेश गिरीश महाजन यांचे संकेत

मुंबई (प्रतिनिधी) – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पार पडल्यानंतर विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा हा पक्षप्रवेश कोणत्याही अटिशिवाय असेल, अशी खात्रीलायक माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज सकाळी भाजपचे नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानी भेट घेतली. उभय नेत्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश आता ही एक औपचारिकता आहे. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. भाजप प्रवेशानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता महाजन म्हणाले, त्यांना मंत्रिपद द्यायचे किंवा नाही, हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याबाबत मी काहीच सांगू शकत नाही. मात्र, विखे-पाटील यांना कोणत्याही अटिशिवाय पक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे महाजन यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल आम्हालाही काही मर्यादा असल्याचे सांगतानाच आगामी विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 60 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

मुलाला पक्षाने लोकसभा निवडणूकीत उमेदवारी न दिल्याबद्दल विखे-पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा अद्याप दिलेला नाही. भाजप पक्षप्रवेशाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, मी याबाबत अद्याप विचार केलेला नसून कॉंग्रेसचे कोणतेही आमदार माझ्या संपर्कात नाहीत, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेसने अन्याय केला – विखे-पाटील
गिरीश महाजन यांच्या भेटीबाबत राधाकृष्ण विखे-पाटील यांना विचारले असता, माझा मुलगा डॉ.सुजय याला लोकसभा निवडणूकीत विजयासाठी पाठिंबा दिल्याबद्दल मी महाजन यांचे आभार मानायला आलो होतो. शिवाय मी वैद्यकिय महाविद्यालय चालवितो. वैद्यकिय महाविद्यालयातील मराठा आरक्षणाचा कोटा न्यायालयाने रद्द केल्यासंदर्भात महाजन यांच्याशी चर्चा केली, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. सुजयच्या निवडणूकीत मी त्याचा खुलेआमपणे प्रचार केल्याबद्दल माझ्यावर पक्षाने कारवाई केली. माझ्या मुलाला तिकिट नाकारून कॉंग्रेसने अन्याय केल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here