उन्हाच्या तीव्रतेतही टॅंकर वाढीच्या प्रमाणात घट

पाणीटंचाईची भिषणता वाढत असतांना टॅंकर संख्येत मात्र किरकोळ वाढ ; मे महिन्यात 26 टॅंकर वाढले

नगर: नगर जिल्ह्यात पाण्याच्या उद्‌भवांबरोबरच पाझर तलाव, लघुप्रकल्प कोरडे पडले असून पाणीटंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत असतांना दुसरीकडे मात्र टॅंकर संख्येत त्याप्रमाणात वाढ होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतच आडल्याने सध्या तरी जिल्ह्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा ही एकमेव उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मात्र उन्हाची तीव्रता पाहता त्या प्रमाणात टॅंकरच्या वाढी होत नाही.

प्रशासकीय स्तरावर टॅंकरचे प्रस्ताव एक तर मंजूर होत नसली, किंवा लोकांची मागणीच कमी झाली असेल. त्यामुळे टॅंकर वाढीचे प्रमाणात एकदम घटले असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. अर्थात प्रशासनाकडून टॅंकरची तपासणी सुरू केल्याने त्याचा परिणाम म्हणून देखील टॅंकर वाढीचे प्रमाण कमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मे महिन्यात अवघे 26 टॅंकर वाढले.

जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्यापासून पाणीटंचाई भासू लागल्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी म्हणजे 63 टक्‍के पाऊस झाल्याने खरीपापाठोपाठ रब्बी हंमाम वाया गेला. होते नव्हते ते पाण्याचे स्त्रोत कसेबसे फेब्रुवारी मार्चपर्यंत तग धरून होते. परंतू त्यानंतर पाझर तलाव, गाव तलाव, लघु प्रकल्प तसेच बोअरवेल, विहिरींमधील पाणी अडले. ग्रामीण भागात अनेक गावांसह वाड्या वस्त्यांना टॅंकरच्या पाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जिल्ह्यात मोठे तीन प्रकल्प वगळता सध्या अन्य कोणत्याही मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पाणी शिल्लक नाही.

पिण्याच्या पाण्याची जिल्ह्यात गंभीर स्थिती झाली आहे. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी तो पुरेसा नसल्याने अनेक गावांमध्ये पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. एक हंडाभर पाण्यासाठी तासन्‌तास टॅंकरची वाट पहावी लागत आहे. टॅंकरच्या खेपा देखील कमी होत आहे. जिल्ह्यात पाण्याची स्थिती पाहून प्रशासनाने टॅंकरचे नियोजन केले होते. मे महिन्यात टॅंकरची संख्या एक हजाराच्या पुढे जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. परंतू आज अखेर 808 टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. तब्बल 13 लाख 18 हजार 169 लोकांची तहान टॅंकरच्या पाण्याने भागविण्यात येत आहे.

सर्वाधिक टॅंकर वाढले ते फेब्रुवारी- मार्च दरम्यान तब्बल 190 टॅंकरची वाढ झाली होती. एप्रिल महिन्यात 64 तर मे महिन्यात 26 टॅंकरची वाढ झाली. परंतु जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती पाहता टॅंकरच्या संख्येने ऐन तीव्र उन्हाळ्यात कमी वाढ झाली आहे. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 25 डिसेंबर 2018 रोजी जिल्ह्यात 256 गावे, 1 हजार 315 वाड्यांना 315 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. 5 लाख 64 हजार 452 लोक टॅंकरवर अवलंबून होते. त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात 376 गावे, 1 हजार 947 वाड्या 485 टॅंकरद्वारे 8 लाख 15 हजार 216 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. डिसेंबर ते फेब्रुवारी या दोन महिन्यात 170 टॅंकर वाढले होते. 31 मार्च रोजी 444 गावे, 2 हजार 499 वाड्यांना 675 टॅंकरने पाणीपुरवठा होत होता. 10 लाख 32 हजार 560 लोकांना हा पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत तब्बल 190 टॅंकर वाढले होते. त्यानंतर 10 एप्रिल रोजी 469 गावे, 2 हजार 631 वाड्यांना 708 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी 10 लाख 85 हजार 21 लोकांना टॅंकरचे पाणी देण्यात येत होते. या 11 दिवसात 33 टॅंकर वाढले.

28 एप्रिल रोजी 504 गावे, 2 हजार 774 वाड्यांना 754 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. या 18 दिवसांत तब्बल 46 टॅंकर वाढले. यावेळी 11 लाख 69 हजार 15 लोकसंख्येला पाणीपुरवठा होत होता. 7 मे रोजी 528 गावे, 2 हजार 956 वाड्यांना 772 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. या 9 दिवसात 18 टॅंकर वाढले.त्यानंतर 21 मे रोजी 538 गावे, 3 हजार 75 वाड्यांना 782 टॅंकरने तर 26 मे रोजी 558 गावे, 3 हजार 138 वाड्यांना 808 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. म्हणजे चार दिवसात 26 टॅंकर वाढले आहे. टॅंकर वाढीचे प्रमाण व पाणीटंचाईची तीव्रता पाहता टॅंकरची मागणी तर कमी झाली होत आहे. किंवा टॅंकर मंजूरीचे प्रस्ताव धुळखात पडून असतील, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यात एप्रिल महिन्यापासून जिल्हा प्रशासनने टॅंकर तपासणी सुरू केल्याने त्यांचा परिणाम टॅंकरची संख्या वाढीवर झाला असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. अर्थात सर्व कारणे पाहता टॅंकरच्या संख्येत होणाऱ्या वाढला प्रशासनाकडून ब्रेक लावला जात असल्याचे दिसत आहे.


शासनाकडून राबविण्यात आलेल्या जलयुक्‍त शिवाय अभियानाचे पितळ झाकण्यासाठी टॅंकर वाढू दिले जात नाही. टॅंकर वाढले तर जलयुक्‍त अभियान फोल ठरण्याची भिती शासनाला आहे. निवडणुकीपर्यंत जिल्हा टॅंकरने पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालू होती. परंतू त्यानंतर टॅंकरचे नियोजन कोलमडले आहे. टॅंकरच्या खेपा होत नाही. उद्‌भवावर टॅंकर भरण्याची वेळ व गावात पाणी वाटप करण्यासाठी लागणारा वेळ याचे नियोजन नाही. आज छावणीमध्ये 3 लाखाहून अधिक जनावरे आहेत. परंतू जिल्ह्यात असलेले पशुधन पाहता आज 13 लाखाहून अधिक जनावरे शेतकऱ्यांच्या घरीत आहेत. त्यांना लागणाऱ्या पाण्याचे प्रशासनकडून नियोजन नाही. सरकार पाणी देत नाही म्हणून लोक थांबत नाहीत. पर्याय शोधून पाण्याची व्यवस्था करतात किंवा स्थलांतरीत होत आहे. प्रशासन टॅंकरची संख्या वाढू नये म्हणून प्रयत्न करीत असून लोकांना पाणी-पाणी करण्यास भाग पाडीत आहे.
– राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जिल्हाध्यक्ष.


जिल्ह्यात पाणीटंचाई वाढत आहे. त्या तुलनेत टॅंकरची संख्या देखील वाढत आहे. मागणीनुसार तातडीने टॅंकर मंजूर करण्याचे अधिकार आता तहसीलदारांना देण्यात आले आहे. त्यामुळे मागणी झाल्यानंतर लगेच टॅंकर सुरू करण्यात येत आहे. परंतू जर कोणी टॅंकरच्या मागणीचे प्रस्ताव दडपून ठेवले असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. जिल्ह्यात पाणीप्रश्‍न गंभीर होत आहे. याकडे संपूर्ण लक्ष असून दररोज प्रशासनाकडून माहिती घेवून आवश्‍यक त्या सुचना देण्यात येत आहेत.
– प्रा.राम शिंदे, पालकमंत्री

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here