निविदा प्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी निर्णय
पुणे – महापालिकेचे व्यावसायिक गाळे तसेच व्यावसायिक मिळकती या पुढे निविदा प्रक्रिया न राबविता “ई-ऑक्शन’ (ऑनलाइन बोली लावून लिलाव) द्वारे देण्याची चाचपणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गाळे भाडेकराराने देण्यावरून होणारे वाद तसेच निविदा प्रक्रियेत होणारे हस्तक्षेप दूर होणार असून या वादामुळे या मिळकतींचे बुडणारे उत्पन्न पालिकेस मिळण्यास सुरूवात होणार आहे.
शहरात महापालिकेचे हजारो बांधीव गाळे असून पालिकेकडून ते भाडेकराराने दिले जातात. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून जादा दर देणाऱ्या निविदाधारकास हे गाळे दिले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत या निविदांबाबत आक्षेप उपस्थित केले जातात. त्यामुळे हे गाळे वर्षानुवर्षे पडून राहतात. तसेच त्याच्या देखभाल दुरूस्तीचा बोजाही महापालिकेवरच येतो आणि दुसऱ्या बाजूला उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे हे गाळे या पुढे निविदा प्रक्रिया ऑनलाइन राबवून “ई-ऑक्शन’द्वारे गाळे देण्याबाबत प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेला लागणारा वेळ, त्यावर घेतले जाणारे आक्षेप, तसेच दरांबाबतही पारदर्शकता राहणार आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी, महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी लवकरच हा निर्णय घेऊन तो मान्यतेसाठी ठेवला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.