आठ लाखांचे 27 लाख 50 हजार वसूल करुनही जबरदस्तीने घेतल्या गाड्या
पिंपरी – मुद्दलीच्या कित्येक पट व्याज वसूल करुनही कर्जदाराची वाहने जबरदस्ती नेणाऱ्या व्याजखोर सावकाराला भोसरी पोलिसांनी अटक केली आहेत. आठ लाख रुपये व्याजाने घेतल्यानंतर व्याजाच्या बदल्यात 27 लाख 50 हजार रुपये देऊनही चारचाकी व दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली. हा प्रकार भोसरी येथे 3 जून रोजी उघडकीस आला आहे.
निलेश प्रकाश मेहता (वय-34 रा. आळंदीरोड, भोसरी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सुनिल धर्मा पवार (वय-37 रा. काळेवाडी) या सावकाराच्या विरोधात भादंवि कलम 392, 506 यासह महाराष्ट्र सावकारी कायदा 2004 क 39, 45 नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश मेहता यांनी आरोपी सुनिल पवार याच्याकडून 2016 साली 8 लाख रुपये व्याजाने घेतले होते. या पैशाच्या बदल्यात त्यांनी आत्तापर्यंत पवार याला 27 लाख 50 हजार रुपये दिले होते.
व्याजाच्या पैशाच्या बदल्यात एवढी मोठी रक्कम देऊनही पवार मेहता यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होता. 3 जून रोजी या पैशांच्या व्याजाच्या बदल्यात पवार याने मेहता यांच्या मालकीची चारचाकी गाडी (क्र. एमएच 14/डीए/ 8438) व दुचाकी (क्र. एमएच 14/ईजे/ 0701) जबरदस्तीने घेतली.
त्यानंतर याबाबत मेहता यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी पवार याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे करीत आहेत.