अभ्यासक्रमात समावेश, विद्यार्थ्यांना भाषा निवडण्याचा पर्याय
पिंपरी – अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये यावर्षीपासून चिनी व स्पॅनिश भाषेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जगातील 21 देशामध्ये बोलल्या जाणाऱ्या चिनी आणि स्पॅनिश भाषा शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने अभ्यासक्रमात या भाषेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना भाषा निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या भाषा शिकविणाऱ्या शिक्षकांच्या शोधासाठी महाविद्यालयांना मात्र धावाधाव करावी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षझ मंडळाचा अकरावी व बारावीचा अभ्यासक्रमात बदल करुन अद्यावत अभ्यासक्रम करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीचा अकरावीचा तर पुढील वर्षीचा बारावीच्या अभ्यासक्रामामध्ये बदल होणार आहे. मागील काही वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर परदेशी भाषेचा पर्यायी विषय म्हणून अभ्यास करण्याची मूभा विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावरच फ्रेंच, जर्मन, रशियन, जपानी या भाषेचे पर्याय निवडून या भाषा शिकण्यास मिळत आहेत. या भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा विदेशी भाषा शिकण्याला मिळणारा प्रतिसाद पाहूण शिक्षण मंडळाने यावर्षीपासून चिनी आणि स्पॅनिश या दोन भाषांचा समावेश अभ्यासक्रामध्ये केला आहे.
चिनी व स्पॅनिश या दोन भाषांचा पर्यायी विषय म्हणून अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या भाषेचा अभ्यासक्रम बालभारतीने तयार केला आहे. त्यामुळे, यावर्षीपासून विद्यार्थ्यांना या दोन भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे. चिनी आणि स्पॅनिश या दोन भाषांची जान असलेल्यांना जागतीक स्तरावर मोठी मागणी आहे. स्पॅनिश भाषा तर अनेक विद्यापीठांमध्ये पदवी किंवा पदविका स्तरावर म्हणजेच बारावी झाल्यानंतर अभ्यासण्याचा पर्याय उपलब्ध आहे. केंद्रीय शिक्षण मंडळातही (सिबीएससी) स्पॅनिश भाषेचा अभ्यासक्रमात समावेश आहे. तर चिनी भाषेचे धडे अगदी मोजक्या विद्यापीठामध्ये दिले जातात. मात्र, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर पहिल्यांदाच राज्य मंडळाने चिनी भाषेचा पर्याय उपलब्ध केलेला आहे. त्यामुळे, या दोन भाषां शिकण्यास किती विद्यार्थी प्रतिसाद देतात हे लवकरच प्रवेश प्रक्रियेनंतर समजणार आहे.
असा आहे अभ्यासक्रम
चिनी व स्पॅनिश भाषा अभ्यासक्रम रचनेत आकरावीसाठी अक्षर ओळख, शब्द ओळख, प्राथमिक लेखन, वाचन, उच्चार शिकणे, रोजच्या वापरातील वाक्य बोलता येणे अशी कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसीत करण्यात येणार आहेत. तर बारावीसाठी लेखन कौशल्यावर भर देण्यात येणार आहे.