आता सोशल मीडियाकडे लक्ष?

नियंत्रण ठेवणे अशक्‍य : उमेदवारांना बंधने


 उमेदवार, स्टार प्रचारकांना “लाइव्ह बंदी’

पुणे – पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी जाहीर प्रचाराची मुदत रविवारी संपली असली, तरी आता मतदानाच्या दिवसापर्यंत सोशल मीडियातून प्रचाराचा धुमाकूळ घातला जाण्याची शक्‍यता आहे. सोशल मीडियातील मेसेज तसेच माहितीवर कोणत्याही स्थितीत नियंत्रण ठेवले शक्‍य नसल्याने उमेदवारांचा प्रचार आता या माध्यमातून पुढील काही तास केला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दरम्यान, निवडणुकीसाठी उमेदवार असलेल्या तसेच स्टार प्रचारकांनाही कोणत्याही स्थितीत सोशल मीडियात लाइव्ह तसेच संदेशाद्वारे आपला प्रचार करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत.

गेल्या काही वर्षांत देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून त्यातही प्रामुख्याने फेसबुक आणि व्हॉट्‌स ऍपद्वारे मोठ्या प्रमाणात मेसेजची देवाणघेवाण केली जात आहेत. त्यातच अशा ग्रूपवर तसेच ब्रॉडकास्ट ग्रूपवर एकाच वेळी शेकडो जणांशी संवाद साधता येत असल्याने माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी त्याचा मोठा वापर होत आहे. याचाच फायदा घेत उमेदवारांची माहिती, माहिती पत्रके, वोटर स्लीप अशी माहिती लिंकच्या स्वरूपात पाठविण्यात येत आहे. त्यामुळे एका बाजूला जाहीर प्रचार बंद असला, तरी दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावरही प्रचाराने धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील काही तास हा प्रकार आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

अनेक ग्रूपवर जनजागृतीही
दरम्यान, रविवारी सायंकाळी प्रचाराची सांगता झाल्याने जाहीर प्रचार बंद झाला आहे. त्यामुळे ग्रूपमधील सदस्यांनी कोणत्याही पक्षाशी तसेच उमेदवाराशी संबंधित पोस्ट ग्रूपवर टाकू नयेत, असे मेजेसही अनेक सोशल मीडियावरील ग्रूपवर दिवसभर फिरताना दिसून आले. त्याला संदर्भ म्हणून पोलिसांच्या सूचनांचे व्हिडीओ पाठविण्यात येत आहेत. तसेच “अशा प्रकारामुळे ग्रूपवर अथवा ऍडमिनबाबत पोलीस तसेच आयोगाकडून चौकशी अथवा माहिती विचारणा झाल्यास सर्व जबाबदारी संबंधित सदस्यांची असेल,’ अशा जाहीर सूचनावजा इशारा देणारे मेसेजही सोशल मीडियावर फिरत आहेत.

मोदी, गांधींचा पुण्यात मुक्‍काम, पण सभा नाही
या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पुण्यात मुक्कामी होते. पण या दोन्ही नेत्यांकडून एकही सभा घेण्यात आली नाही. या उलट मागील निवडणुकीत मोदी यांनी पुण्यात सभा घेऊन निवडणुकीचा नूर बदलून टाकला होता. यावेळी मोदी यांची अकलूजमध्ये सभा होणार होती. त्या सभेच्या एक दिवस आधी ते पुण्यात मुक्कामी आले होते. मात्र, त्यांच्याकडून ना सभा घेण्यात आली ना पदाधिकाऱ्यांची बैठक. कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनीही मगरपट्टा सिटी येथे एका कार्यक्रमात महाविद्यालयीन मुलांशी संवाद साधला. मात्र, त्यांनीही उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा अथवा रॅली घेतली नाही.

चर्चा फक्‍त राज ठाकरेंचीच
या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजपच्या मोठ्या सभा झाल्या नसल्या, तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपविरोधात पुण्यात घेतलेली सभा लक्षणीय ठरली. ठाकरे यांनी थेट कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नसला, तरी मनसेचे कार्यकर्ते मात्र कॉंग्रेसच्या प्रचारात सक्रिय असल्याचे दिसून आले. ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांवरून चांगलाच समाचार पुण्यात घेतला. मात्र, मुख्यमंत्री वगळता इतर भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून ठाकरे यांना प्रत्युत्तर अथवा त्यांच्या टीकेला उत्तर दिले नसल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)