पुणे – विद्यार्थीदशेतील निवडणुका पक्षविरहित असव्यात

विद्यार्थ्यांच्या बदलत्या संस्कृतीवर अभिसभेत कुलगुरूंनी वेधले लक्ष

पुणे – विद्यार्थी दशेतील पक्षविरहित राजकारण हा लोकशाहीचा आत्मा आहे. म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा व परिनियमांद्वारे विद्यार्थ्यांच्या निवडणुका पुढील शैक्षणिक वर्षापासून बहाल करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आपल्याला तयारी करावे लागेल. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या पूर्वग्रहांचे निरसन होणे हीच खरी गरज आहे, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीवर भाष्य मांडले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा शनिवारी झाली. त्यात कुलगुरू डॉ. करमळकर यांनी विद्यार्थ्यांची सध्याची वाटचाल पाहता, त्याबाबत त्यांनी अधिसभेत सदस्यांचे वेगळ्याच गंभीरपूर्वक विषयाकडे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या बदलत्या संस्कृतीवर कुलगुरूंनी आपल्या भाषणातून चिंता व्यक्‍त करीत, त्यावर विचारमंथन करण्याचे आवाहन अधिसभा सदस्यांना केले.

अधिसभेला सादर केलेल्या अहवालात डॉ. करमळकर म्हणतात, “आज विद्यार्थी दिशाहिन झाल्यासारखा दिसतो आहे, ही माझी चिंता आहे. त्याची सांस्कृतिक वाढ कुंठीत झाली आहे. तो एका परिघातून, एका प्रतलातून पलीकडे जायला तयार नाही. अशा युवकांमध्ये जोश भरण्याची आणि त्यांच्यात नवे भान आणण्याची गरज आहे.

विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे आणि तो सदैव राहणारच. मी स्वत: विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थीदशेचा भोक्‍ता आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची जाण मला पुरेपूर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भरणपोषण जसे झाले पाहिजे तशी त्याची सामाजिक, सांस्कृतिक व सैद्धांतिक पातळीवर एकात्मिक व बहुजिनसी जडणघडणसुद्धा झाली पाहिजे, असते ते म्हणाले.

लोकप्रिय मसुद्यातून बाहेर पडून त्यांना संरचनात्मक अधिष्ठान देण्याची गरज आहे. आपला प्रदेश, जिल्हा, तालुका, गाव, कुटुंब या सर्वांप्रती आपले कर्तव्य आहे. ते कर्तव्य बजावण्यासाठी आपण ठराविक कालमर्यादेत सिद्ध होण्याची आतंरिक जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. वैयक्‍तिक स्वार्थ, तात्पुरता व तकलादू स्वार्थ न पाहता आपल्या समाजाच्या उन्नतीची विशाल स्वप्ने विद्यार्थ्यांनी पाहिली पाहिजेत, असेही कुलगुरूंनी अहवालात म्हटले आहे.

प्रस्ताव पाठवा…स्वागतच आहे
प्रश्‍न, सत्यता, वस्तुस्थितीची शहानिशा न करता आणि स्वत:च्या कर्तव्याची जराही आठवण न ठेवता विपर्यास आणि वादग्रस्त राहण्याची जी संस्कृती निर्माण झाली आहे, ती बदलणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी सभागृहाने आपले प्रस्ताव द्यावेत. त्याचे स्वागत आहे, असेही कुलगुरू डॉ. करमळकर यांनी अहवालात नमूद केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.