नवीन पटनाईक यांचीच ओडिशामध्ये चलती

बिजद सलग पाचव्यांदा स्थापन करणार सरकार

भुवनेश्‍वर: ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे (बिजद) प्रमुख नवीन पटनाईक यांचीच त्या राज्यात चलती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विधानसभा निवडणुकीत बाजी मारत ओडिशामध्ये सलग पाचव्यांदा सरकार स्थापन करण्यास बिजद सज्ज झाला आहे.

ओडिशामध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान झाले. विधानसभेच्या एकूण 146 जागांपैकी शंभरीचा टप्पा ओलांडत बिजदने स्पष्ट बहुमत मिळवले. देशभरात मोदी त्सुनामी असतानाही ओडिशात बिजदने मिळवलेला विजय उल्लेखनीय ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नामुष्कीजनक पीछेहाट पाहाव्या लागलेल्या कॉंग्रेसवर ओडिशातही नाचक्कीची वेळ आली. त्या राज्यात 2000 पासून बिजद सत्ताधारी बाकांवर आहे. तेव्हापासून प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या कॉंग्रेसवर ती भूमिकाही सोडण्याची वेळ यावेळी आली आहे. यावेळी त्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजप ठरणार आहे.

साहजिकच, त्या राज्यात कॉंग्रेस यावेळी तिसऱ्या स्थानावर राहणार आहे. ओडिशाची सत्ता मिळवण्याचे भाजपचे स्वप्न अपुरे राहिले तरी त्या राज्यात मिळालेल्या लोकसभेच्या अधिक जागांमुळे त्या पक्षाला दिलासा मिळणार आहे. ओडिशात लोकसभेच्या एकूण 21 जागा आहेत. त्यातील तब्बल 20 जागा बिजदने मागील वेळी पटकावल्या होत्या. यावेळी बिजदला लोकसभेच्या 14 तर भाजपला 7 जागा मिळाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)