महाराष्ट्राच्या मानस धामणे याला दुहेरी मुकुट

एमएसएलटीए योनेक्‍स राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा

पाचगणी – मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अव्वल मानांकीत मानस धामणे याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकीत रुमा गाईकैवारी हिने येथे पार पडलेल्या रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावले.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित मानस धामणेने कर्नाटकच्या आठव्या मानांकीत स्कंद रावचा 6-2, 6-1असा पराभव केला. पुण्याचा मानस बिशप्स स्कुल येथे पाचवी इयत्तेत शिकत असून त्याचे या वर्षातील या गटातील हे तिसरे विजेतेपद आहे. मानस एपीएमटीए येथे प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

मुलींच्या गटीत महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकीत रुमा गाईकैवारीने महाराष्ट्राच्याच मधुरीमा सावंतचा 6-2, 6-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. रूमा हि डीइएस सेकंडरी शाळेत सातवी इय्यतेत शिकत असून मॅस्ट्रो येथे प्रशिक्षक प्रणव वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

दुहेरीच्या मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या मानस धामणेने गुजरातच्या आर्यन शहाच्या साथीत कर्नाटकच्या अदित अमरनाथ व स्कंद राव यांचा 7-5, 7-5 असा पराभव करत दुहेरी मुकूट संपादन केला. मुलींच्या गाटात तेलंगणाच्या सौम्या रोंडेने आंध्र प्रदेशच्या रिधी चौधरीच्या साथीत महाराष्ट्राच्या परी चव्हाण व कायरा चेतनानी यांचा 0-6, 7-5, (10-6) असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली आहेत. स्पर्धेतीत विजेत्यांना 50 एआयटीए गुण व उपविजेत्यांना 40 एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रवाईन हॉटेलचे मालक अब्दुल सुनेसरा व करमजीत जोहल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक जावेद सुनेसरा आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.