महाराष्ट्रातील 8 महिला खासदार संसदेत

भाजपच्या 5, तर शिवसेना, राष्ट्रवादी व अपक्ष प्रत्येकी 1 खासदार

मुंबई: 17व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणूकीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजपने घवघवीत यश संपादन करीत विरोधकांचा दणदणीत पराभव केला. भाजपाचे 23, शिवसेनेचे 18, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4 व कॉंग्रेस 1 व एमआयएमचा 1 खासदार विजयी झाले आहेत. या विजयी उमेदवारांमधून 8 महिला खासदार संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यामध्ये भाजपच्या 5, तर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व अपक्ष असे प्रत्येकी मिळून 1 याप्रमाणे एकूण 8 महिला खासदारांचा समावेश आहे.

लोकसभेसाठी झालेल्या मतदानाचे गुरूवारी निकाल जाहिर झाले. यामध्ये शिवसेना-भाजपाने 2014 सालची पुनरावृत्ती करीत पुन्हा एकदा महाराष्ट्रात युतीचा भगवा झेंडा फडकवला. 48 मतदारसंघातून एकूण 867 उमेदवारांपैकी 80 महिला उमेदार रिंगणात उतरल्या होत्या. यामध्ये पारंपारिक राजकिय पक्षांनी 11 महिलांना संधी दिली होती. गुरूवारी जाहिर झालेल्या निकालावेळी 8 मतदारसंघातून महिला खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे निवडून आलेल्या महिला खासदार राजकिय कुटुंबातीलच आहेत. सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस-बारामती), भावना गवळी (शिवसेना-यवतमाळ-वाशिम), नवनीत राणा (अपक्ष-अमरावती), प्रितम मुंडे (भाजपा-बीड), रक्षा खडसे (भाजप-रावेर), हिना गावीत (भाजप-नंदुरबार), पुनम महाजन (भाजप-उत्तर मध्य मुंबई), भारती पवार (भाजप-दिंडोरी) या महिला खासदार लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत.

बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कूल यांच्यावर 1,55,774 मतांनी मात केली. 2014च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांचा 80,000 मतांनी पराभव केला होता. सुळे या तिसऱ्यांदा संसदेवर निवडून गेल्या आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी कॉंग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांचा तब्बल 1,17,939 मतांनी पराभव केला. 2014 सालच्या निवडणुकीमध्ये यवतमाळ-वाशिममधून त्यांनी कॉंग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा 93,816 मतांनी पराभव केला होता.

रावेर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी कॉंग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांचा 3,35,882 मतांनी पराभव करीत दुसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेल्या आहेत. 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांचा जवळपास 3 लाख मतांनी पराभव केला होता. बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम गोपिनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बजरंग सोनावणे यांचा 1,68,368 मतांनी पराभव केला. 2014 साली बीडमधून गोपीनाथ मुंडे यांनी सुरेश धस यांचा 1,36,454 मतांनी पराभव केला होता.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये पुन्हा पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचा विजय झाला होता. त्या आता पुन्हा एकदा संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. नंदूरबारमधील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना विजयकुमार गावित यांनी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. के. सी. पाडवी यांच्यावर 95629 मतांनी मात केली. 2014 च्या निवडणुकीत हिना गावित यांनी माजी खासदार माणिकराव गावीत यांचा 1,06,905 मतांनी पराभव केला होता. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन यांनी कॉंग्रेसच्या प्रिया दत्त यांचा 1,30,005 मतांनी पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा 1,86,771 मतांनी पराभव केला होता.

अमरावतीत अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा 36,951 मतांनी पराभव केला. 2014 सालच्या निवडणुकीमध्ये अमरावतीतून शिवसेनेच्या आनंदराव आडसूळ यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा 1,37,932 मतांनी पराभव केला होता. या पराभवाची परतफेड करीत त्या लोकसभेवर निवडून आल्या आहेत. दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महाले यांचा 1,98,779 इतक्‍या मतांनी पराभवाची धूळ चारत त्या पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×