जिल्हा बॅंकेच्या पाथर्डी शाखेतील मनमानीला शेतकरी वैतागले

जिल्हा बॅंकेच्या ढिसाळ नियोजनाचा ग्राहकांना फटका

पाथर्डी
– जिल्हा सहकारी बॅंकेच्या पाथर्डी शाखेतील ढिसाळ नियोजनाचा फटका ग्राहकांना बसत असून कर्मचाऱ्यांच्या मनमानीला सामोरे जात शेतकऱ्यांना तासन्‌तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. पैसे काढण्याचा किंवा भरण्याचा फॉर्म मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा संपूर्ण दिवस गेल्याची उदाहरणे आहेत. ग्रामीण भागातून काम बुडवून आलेल्या शेतकऱ्यांचे व मजुरांचे एका दिवसात काम मार्गी लागत नाही. वेळ संपला, आज गर्दी आहे, आज होणार नाही, कर्मचारी रजेवर आहे, उद्या या अशी नेहमीची साचेबद्ध उत्तरे देऊन बोळवण केली जात आहे. कुठल्याही कामाला नकार घंटा वाजवून अपूर्ण कर्मचाऱ्यांचे नेहमीच रडगाणे गात प्रशासनाकडून सुरू असलेली ग्राहकांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग व जिल्हा बॅंकेचे वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क येत असल्याने अतूट नाते निर्माण झाले आहे. बहुतांशी शेतकऱ्यांची बॅंक खाती जिल्हा बॅंकेत आहेत. त्यामुळे शासनाकडून वेगवेगळ्या योजनांसाठी दिले जाणारे अनुदान जिल्हा बॅंकेच्या शाखेत जमा होते. त्याचबरोबर सहकारी सोसायट्यांकडून वाटप होणारे कर्जही जिल्हा सहकारी बॅंकेच्या खात्यात जमा होते. शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंकेचे खाते नंबर दिल्याने नेहमी नेहमी शेतकऱ्यांना बॅंकेच्या दारात जावे लागत आहे. बॅंकेतील संचालकांच्या वशिल्याने तालुक्‍यातील अनेक कर्मचारी पाथर्डी शाखेत बदली करून आले आहेत.

घराजवळच बॅंक त्यात परिसरातच नाते-गोते, राजकीय वरदहस्त असा तिहेरी संगम अनेक कर्मचाऱ्यांच्या नशिबी आल्याने सहकारी बॅंक म्हणजे आपलीच मालमत्ता असे समजून ग्राहकांना उद्धट वागणूक दिली जात आहे. बॅंकेत आलेल्या ग्राहकांना सन्मानाची वागणूक तर सोडाच साधा योग्य सल्लाही दिला जात नाही. स्वतःच्या कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तर अक्षरशः अनेक वेळा अपमानित व्हावे लागत आहे. अडाणी ग्राहकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना कर्मचारी अत्यंत उर्मट व खालच्या पातळीची भाषा वापरतात. परिसरातील अनेक माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे पगारही याच शाखेत जमा होतात. शिक्षकांना त्यांचे पगार देणे म्हणजे आपण त्यांच्यावर उपकार करतो असा अविर्भाव बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या वर्तनात असतो.

नातेगोते व राजकीय वशिला असलेल्या ग्राहकांना बॅंकेत पाठीमागील दरवाजाने प्रवेश मिळतो. असे वशिल्याचे ग्राहक. कर्मचाऱ्याच्या जोरावर बॅंक आपल्या मालकीची असल्याचे भासवून रांगेत उभे असलेल्या ग्राहकांना अक्षरशः खिजवतात. थेट कॅशियरच्या केबिनपर्यंत जाऊन आपले पैसे घेण्यापर्यंत त्यांची मजल जाते. हा सर्व प्रकार सर्वसामान्य ग्राहकांना डोळ्यादेखत सहन करावा लागतो. आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर जाणीवपूर्वक चकरा माराव्या लागतील. या भीतीने गप्प बसावे लागते. नियमावर बोट ठेवणाऱ्या ग्राहकांना इथे पटत नसेल तर अनेक बॅंका आहेत तिथे जा, असे उद्धटपणे उत्तर कर्मचाऱ्यांकडून दिले जाते.

सध्या सहकारी सोसायटीकडून नवीन कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. कर्जाचा हप्ता बॅंकेतून मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची बॅंकेचे दारात तोबा गर्दी आहे. नियमित ग्राहक व कर्जाच्या हप्त्यासाठी आलेले शेतकरी यामुळे बॅंकेत तोबा गर्दी होते. मात्र बॅंक प्रशासनाकडून यासंदर्भात कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रत्येक काउंटरवर फक्त गोंधळ पाहावयास मिळतो. आपला नंबर कधी येईल, यासंदर्भात ग्राहकाला कुठलीही माहिती मिळत नाही. दिवस दिवस शेतकरी काउंटरसमोर बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्याकडे आशेने पाहताना दिसतात. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असा ग्राहकांचा आग्रह असूनही ओळखीच्या चेहऱ्याला प्रथम प्राधान्य असा मनमानी नियम येथे लागू होतो. जिल्हा बॅंकेच्या जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून ग्राहकांना न्याय द्या, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)