पुणे महापालिकेत पुन्हा चोरी : सीसीटीव्हीसह नळ, पितळी नॉझल लंपास

सुरक्षा रक्षक करतात तरी काय?

पुणे – अवघ्या तीन महिन्यांपूर्वी वापर सुरू करण्यात आलेल्या महापालिकेच्या विस्तारीत इमारतीत पुन्हा एकदा भुरट्यांनी हात साफ केला आहे. या वेळी चोरांनी चक्क सीसीटीव्हीच गायब केला असून अग्निशमन यंत्रणेचे हॉज पाईप आणि पाण्याच्या फवाऱ्यांसाठीचे 9 पितळी नॉझल चोरी केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेचा पोरखेळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

महापालिकेने तब्बल 53 कोटी रुपये खर्च करत ही इमारत बांधली आहे. या चार मजली इमारतीत मुख्य सभागृह, महापौर तसेच पक्षनेत्यांची दालने आणि नगरसचिव विभागासह, संगणक विभागाचे कामकाज चालते. अनेकदा रात्री उशिरापर्यंतही नागरिक असतात. इमारतीच्या काही भागचे फर्निचर कामही सुरू आहे. याचाच गैरफायदा घेत गुरूवारी रात्री भुरट्या चोरांनी येथील अनेक वस्तुंवर हात साफ केला आहे. त्यात, तब्बल 26 स्वच्छतागृहातील पाण्याचे बळ, टॉयलेटमधील 26 हॅन्ड फ्लश, अग्निशमन यंत्रणेसाठी पार्किंगच्या बेसमेंटमध्ये बसविण्यात आलेल्या हॉज पाइपच्या बॉक्‍स मधील चार 100 मीटर लांबीचे हॉज पाइप तसेच त्याचे मोठे पितळी नॉझलही गायब केले आहेत, या शिवाय, अग्निशमन यंत्रणेच्याच 1 इंची पाईपचे सुमारे 9 पितळी नॉझलही चोरी झाल्याचे सांगण्यात आले.

सीसीटीव्ही चोरी होईपर्यंत प्रशासन गप्प कसे?
या इमारतीमध्ये स्वतंत्र लिफ्ट बसविण्यात आली आहे. ही तीन ते चार नागरिकांचीच क्षमता असलेली लिफ्ट असून ती फक्त महापौरच वापरतात. मात्र, त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी वापर केल्यास तसेच सुरक्षेच्या कारणास्तव तळमजल्यावर या लिफ्टच्या वर सीसीटीव्ही बसविण्यात आला होता. हा कॅमेराच चोरांनी पळविला आहे. विशेष म्हणजे, या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारपासून अवघ्या काही अंतरावर हा कॅमेरा आहे. मात्र, त्यानंतरही ही चोरी कोणाच्याही लक्षात आलेली नाही. त्यामुळे सुरक्षेसाठी लावलेले सीसीटीव्ही चोरी होत असतील, तर प्रशासन नेमके करते काय? असा प्रश्‍न आहे.

आवो.. जावो घर तुम्हारा
ही इमारात वापर सुरू झाल्यापासून वादग्रस्त राहिलेली आहे. या पूर्वीही या इमारतीत पाण्याचे नळ तसेच चक्क दरवाजांच्या पितळी बिजागऱ्या आणि पितळी हॅंडल चोरीस गेले होते. त्यानंतरही या इमारतीच्या सुरक्षेकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे. एका बाजूला जुन्या इमारतीच्या सुरक्षेसाठी रात्री 20 ते 25 सुरक्षा रक्षक कार्यरत असताना, या इमारतीसाठी अवघे 2 सुरक्षा रक्षक तैनात आहेत. ते सुद्धा रात्रीच्या वेळी गायब असल्यानेच हे प्रकार होत असल्याचे प्रशासनाकडूनच सांगण्यात येत आहे.

तक्रार का नाही?
अशा प्रकारच्या चोऱ्या दुसऱ्यांदा होऊनही महापालिका प्रशासन गप्पच असून याबाबत साधी तक्रार अथवा चौकशी करण्याची तसदीही महापालिकेच्या सुरक्षा विभागाने घेतलेली नसल्याचे या घटनेनंतर समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.