तिसऱ्या फेरीसाठी आज लॉटरी काढणार

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्‍क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्‍के प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी राज्यस्तरीय लॉटरी आज (बुधवार) काढण्यात येणार आहे.

राज्यात “आरटीई’ प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विविध जिल्ह्यांतील 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 808 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी 2 लाख 45 हजार 488 ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. लॉटरीद्वारे प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 67 हजार 716 जागा उपलब्ध झाल्या होत्या. त्यातील 47 हजार 35 जागांवर प्रवेश निश्‍चित करण्यात आले आहेत. या फेरीतील 20 हजार 681 जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी लॉटरीद्वारे 35 हजार 276 जागा दर्शविण्यात आल्या होत्या. यातील 20 हजार 25 जागांवरच प्रत्यक्षात प्रवेश झाले आहेत. या दुसऱ्या फेरीतील 15 हजार 251 जागा शिल्लक राहिल्या आहेत

पहिल्या व दुसऱ्या फेरीसाठी एकूण 1 लाख 2 हजार 992 प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या होत्या. त्यातील 67 हजार 60 जांगावर शाळांमध्ये प्रवेश निश्‍चित झाले आहेत. एकूण 49 हजार 748 प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत. बहुसंख्य पालकांनी सोयीच्या शाळा न मिळाल्यामुळे प्रवेशाकडे पाठ फिरविली आहे.

एनआयसीमार्फत डेटा रन करून तिसऱ्या फेरीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर पालकांना “एसएमएस’ पाठविण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)